Published On : Fri, Sep 20th, 2019

उत्सवात स्वच्छता आणि सुविधांवर भर द्या : आयुक्त अभिजीत बांगर

धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा, ताजबाग उर्सच्या तयारीचा घेतला आढावा

नागपूर: पुढील महिन्यात नागपुरात होउ घातलेल्या उत्सवाच्या आयोजनामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. या उत्सवाच्या निमित्ताने सहभागी होणा-या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने योग्य सोयी सुविधा पुरविणे आणि उत्सवादरम्यान व नंतर स्वच्छतेवर विशेषत्वाने भर देणे ही महत्वाची कामे असून यंत्रणेने याबाबत दक्ष राहावे, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

येत्या २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान ताजबाग येथील उर्स व ८ ऑक्टोबर होउ घातलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा उत्सवांच्या तयारीसंदर्भात शुक्रवारी (ता.२०) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे यांच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले, नागपुरात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हे उत्सव उत्साहात साजरे केले जातात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपुरात देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल होतात. या सर्व नागरिकांना सोयी सुविधा देणे हे नागपूर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे जलप्रदाय विभाग, लोककर्म विभाग, स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, परिवहन विभाग यासह सर्व संबंधित विभागाच्या अधिका-यांनी त्याची तयारी आतापासूनच सुरू करावी. शासनाच्या अन्य विभागासोबत समन्वय ठेवून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात. पिण्यासाठी मुबलक स्वच्छ पाणी, टँकर, मोबाईल टॉयलेट, तात्पुरते प्रशासनगृह, माहिती कक्ष, आरोग्य विभागातर्फे आरोग्य सुविधा प्राधान्याने तत्पर ठेवाव्यात तसेच परिवहन विभागाद्वारे दीक्षाभूमी येथे जाण्यासाठी बस सुविधा पुरविण्यात येते यासाठी विभागाने आवश्यक तयारी पूर्ण करावी. अग्निशमन विभागाची भूमिका यावेळी महत्वाची असते. कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चमुने सज्ज राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनासोबतच दस-या निमित्ताने होणारे रावण दहन आणि ताजबाग येथील उर्स मध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होतात. हे तिन्ही उत्सव एका पाठोपाठ असल्याने त्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

स्वच्छतेवर भर
उत्सवादरम्यान योग्य सोयी सुविधा पुरविण्यासोबतच उत्सवानंतरची स्वच्छता हे मोठे आव्हान असते. आरोग्य विभागाने त्याचेही योग्य नियोजन करुन तातडीने परिसराची स्वच्छता करावी. स्वच्छतेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू नये. संपूर्ण यंत्रणा या कामी लावून स्वच्छतेवर भर द्यावा, असेही ते म्हणाले.

परिसरात कोणत्याही प्रकारे घाण होउ नये यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. उर्स, दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवस्थळी कुठेही पाणी जमा होउ नये याची विशेष काळजी घ्यावी. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणा-या लाखो अनुयायांसाठी विविध संस्था संघटनेमार्फत भोजनाची व्यवस्था केली जाते. अशा ठिकाणी कोणतिही घाण होउ नये यासाठी दीक्षाभूमीवर वेगळे फुड झोन तयार करणे व प्रत्येक भोजन स्टॉलपुढे कचरा पेट्यांची व्यवस्था करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. दीक्षाभूमीवर लागणा-या प्रत्येक स्टॉलधारकांना मनपातर्फे कचरापेटी देण्यात येणार असून त्यामध्येच त्यांना कचरा टाकावा लागणार आहे. याशिवाय परिसरात प्लास्टिकचा वापर होउ नये यासाठी दुकानदारांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.