Published On : Sat, Mar 13th, 2021

लसीकरणाची संख्या आणि चाचण्या वाढवून कोरोना नियंत्रणात आणण्यावर भर

महापौर आणि आयुक्तांची आढावा बैठक : दहा नविन लसीकरण केंद्रांच्या निर्मितीचा निर्णय : नगरसेवकांची मदत घेणार

नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मनपाद्वारे कठोर पावले उचलली जात आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे युध्दस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणासाठी दहा नविन लसीकरण केंद्रांच्या निर्मितीचा निर्णय महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतला. तसचे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि शहरातील सुपर स्प्रेडर, हॉकर्स, वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या चाचण्यांवर नगरसेवकांच्या मदतीने भर देण्यात येणार असून सक्तीने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १२) महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पुढील उपाय योजना निश्चित करण्यासंदर्भात चर्चा व आढावा बैठक मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत येथील सभागृहात पार पडली.

बैठकीत उपमहापौर मनिषा धावडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, परिवहन समिती सभापती श्री. नरेन्द्र बोरकर, कर आकारणी व कर संकलन समिती उपसभापती सुनील अग्रवाल, उपसभापती विक्रम ग्वालबंशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, डॉ.सागर पांडे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, अति.सहा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, दहाही झोनचे सहायक आयुक्त, दहाही झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

 महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी लसीकरणासोबतच जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. यासाठी ज्या परिसरात कोरोना रुग्णाची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी जनजागृती करावी. गरज पडल्यास स्थानिक नगरसेवकांची मदत घेउन त्या-त्या परिसरात कोरोना चाचणी कॅम्प लावण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले. तसेच लसीकरणाचा पहिला डोज ज्या आरोग्य सेवकांना देण्यात आला आहे, त्यांना दुसरा डोज घेण्यासाठी अडचण होउ नये यासाठी वेगळी व्‍यवस्था करण्यात यावी. पुढे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोरोना काळात ज्या आरोग्य सेवकांनी, फ्रंट वर्करनी काम केले अशांचा सन्मान कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे यांना दुसरा डोज देण्याची वेगळी व्‍यवस्था करण्यात यावी.

महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, गृह विलगिकरणात असणाऱ्या रुग्णांनी १४ दिवस बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नागपूर महानगरपालिकेद्वारे कारवाईसुध्दा करण्यात येत आहे. मात्र अशा पॉजिटिव्‍ह रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, शारदा मंडळे, विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशी सुचनाही यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यवसायीक, सलून, हॉकर्स, पेपर वाटणारे, छोटे दुकानदार, ठेलेवाले, किराणा दुकानदार या सर्वांची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणेला ताकदीने काम करण्याची गरज आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले. तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना वेळेवर औषधी देण्यात यावी, फोन करून वेळोवेळी त्यांची विचारपूस करावी, पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची त्वरित चाचणी करण्यात यावी असे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महापौरांनी नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही केले.

दुसरी लाट, ब्रेक लावणे आवश्यक : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले की, ही कोरोनाची दुसरी लाट असून यावर ब्रेक लावणे आवश्यक आहे. मागिल चार दिवसांपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे ही साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बध आवश्यक असल्यामुळे १५ ते २१ मार्च दरम्यान निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात नागपूर चाचण्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणखी चाचण्या वाढविण्यावर प्रशासन भर देत आहे असेही ते म्हणाले. नागरिकांमध्ये कोरोनाबद्दलची भिती कमी झालेली दिसत आहे. काही ठिकाणी नियमांचे पालन केले जाते मात्र अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे आणि यामुळे शहरात रुग्णसंख्या वाढत आहे, असे आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले. शहरात चाचण्या वाढविण्यासाठी ४० मोबाईल सेंटर्स सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरात जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी पुढचे आठ दिवस ’नोंदणी मोहीम’ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नविन दहा लसीकरण केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच गरिब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे बसची व्‍यवस्था करण्यात येईल असेही आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले. यामध्ये नगरसेवकांचा सहभाग आवश्यक आहे.

आमदार श्री. प्रवीण दटके यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे गरीब चाय टपरीवाले व अन्य रोजगार करणा-या नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्याची सूचना केली.

सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रकाश भोयर यांनीही यावेळी उपयुक्त सूचना केल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची व्यवस्था केली आहे. सध्या २१४ रुग्ण भर्ती आहे आणि १५ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. खाजगी रुग्णालयातून कोरोना बाधितांचे पैसे संपल्यानंतर शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. अखेरच्या स्थितीत रुग्ण पाठविल्यानंतर त्यांचे उपचार करणे कठिन असते.  महापौरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता नियुक्त झाल्यावर त्यांचे अभिनंदन केले.

कोव्हिड नियमांचे पालन करा : महापौर, आयुक्त

            महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  कोव्हिड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सार्वजनिक स्थानी जाणे टाळावे तसेच मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुणे  आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन करावे तसेच लक्षणे असतील तर चाचणी करावी.