Published On : Sat, Apr 7th, 2018

भांडेवाडी़ डंपिंग यार्डमधील कचर्‍याची विल्हेवाट तातडीने लावा : पालकमंत्री


नागपूर: मनपाच्या भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमधील कचर्‍याची विल्हेवाट ही शास्त्रोक्त पध्दतीने, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पध्दतीने तातडीने लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनपा प्रशासनाला दिले.

या डंपिंग यार्डची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्विन मुद्गल उपस्थित होते. शहरातील सर्व कचरा येथे साठवला जातो. उन्हाळ्यात कचर्‍याला आग लागते व आगीच्या धुराने या परिसरातील नागरिकांना त्रास होतो, अशा तक्रारी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या. डंपिंग यार्ड गावठाणापासून 100 मीटर दूर नेण्यात यावे.

कचर्‍यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीचा प्रकल्प लवकर सुरु करण्यात यावा. कचर्‍याच्या र्ढिंगार्‍यावर औषध फवारणी करण्यात यावी. या भागात येणार्‍या रस्ता दुरुस्त करून रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावे. 24 तास सुरक्षा रक्षक या भागात तैनात ठेवण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. मनपाद्वारे 800 टन कचर्‍यांपासून वीज निर्मितीचा प्रकल्प येथे होणार आहे. याप्रसंगी महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.