Published On : Mon, Sep 27th, 2021

नागपूर शहरात विशेष मोहिमेत ३७ लाख रुपयांची वीज

Advertisement

चोरी उघडकीस: दंड न भरल्यास पोलीस कारवाई

नागपूर : नागपूर शहरात २१ ते २४ सप्टेंबर या चार दिवसात वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध विशेष पथकाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेत ९८ ग्राहकांकडील सुमारे ३६ लाख ९७ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आली असून जे ग्राहक महावितरणने वीज चोरीबाबत आकारलेल्या दंडासह वीज बिलाची रक्क्म भरणार नाहीत, अशा ग्राहकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

महावितरणने नागपूर शहरातील गांधीबाग,सिव्हिल लाईन आणि महाल विभागात वीज चोरीच्या विरोधात मागील आठवड्यात विशेष मोहीम राबविली. नागपूर शहर मंडल,नागपूर ग्रामीण मंडल,वर्धा,यवतमाळ,भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या भागातील अभियंते,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकांद्वारे ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २५० पेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या मीटर व वीज यंत्रणेची तपासणी करण्यात आली.

या तपासणी मोहिमेदरम्यान मीटर मध्ये छेडछाड किंवा आकडे टाकून विजेचा अवैध वापर करणारे ९४ ग्राहक आढळून आले. त्यांच्या कडील युनिटची तपासणी केली असता ही वीज चोरी एकूण ३६ लाख ९७ हजाराची असल्याचे आढळून आले. या ग्राहकांच्या विरोधात विद्युत कायदा कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली.तसेच त्यांना वीज चोरीच्या दंडासह वीज बिल देण्यात आलेआहे. या ग्राहकांपैकी ५ ग्राहकांनी त्वरित १ लाख २५ हजार रुपयांचा रुपयांचा भरणा केला आहे. अन्य पद्धतीने वीज चोरी करणारे ४ ग्राहक आढळून आले. त्यांच्याकडील वीज चोरीची एकूण रक्कम १ लाख ७ हजार रुपये एवढी होती. या ग्राहकांवर विद्युत कायदा कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली आहे. वीज चोरीच्या दोनही प्रकरणात ग्राहकांकडून दंडात्मक रकमेसह वीज बिल वसुलीची प्रक्रिया सुरु आहे.

वीज ग्राहकांना सवलतीच्या दरात अखंडित सेवा देणाऱ्या महावितरणची अवस्था थकबाकीमुळे अत्यंत बिकट झाली आहे.त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलांचा नियमित भरणा करावा व महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे. ज्या कामांसाठी वीज पुरवठा घेण्यात आला त्या ऐवजी अन्य कारणासाठी वीज वापर करणे ,आकडा टाकून वीज चोरी करणे ,वीज मीटर मध्ये फेरफार करणे हे सर्व बेकायदेशीर असून तसे केल्यास वीज ग्राहकाविरोधात जबर दंडात्मक कारवाई अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येइल, असा इशारा महावितरणने दिला आहे.