Published On : Tue, Aug 29th, 2017

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पीके वाचविण्यासाठी मागणीनुसार वीज पुरवठा – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement
 

· मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे भूमिपूजन
· शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन
· शेतीला पाणी देण्यासाठी महत्वकांक्षी योजना
· रेवराल येथे 95 लाख 73 हजार रुपये खर्चून पाणीपुरवठा

Bawankule
नागपूर:
अनियमित व अपुऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतातील पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी लोडशेडिंग कमी करुन आवश्यकतेनुसार विजेचा पुरवठा करण्यात येईल. शेतकऱ्यांनीही उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

मौदा तालुक्यातील रेवराल येथे सुमारे 95 लाख 73 हजार रुपये खर्च करुन मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पुरक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात येणार असून या योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती टेकचंदजी सावरकर, अशोक हटवार, सदानंद निमकर, चांगोजी तिजारे, हरिष जैन, नरेश मोटघरे, सरपंच श्रीमती मंदा श्रावणकर, योगेश वाडीभस्मे, हेमराज सावरकर, देवानंद बोरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ग्रामीण भागात शुध्द पिण्याचे पाणी पुरवविण्यासाठी मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येत असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण जनतेला आरओ असलेले पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महिला बचतगटाच्या माध्यमातून शुध्द जलयंत्र बसविण्यात येत आहे. केवळ पाच रुपयामध्ये 25 लिटर पाणी उपलब्ध होत असल्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाही. येत्या वर्षात ही योजना पूर्ण करुन येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यकतेनुसार वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देतांना ते पुढे म्हणाले की, सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक गावात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात येणार असून तलाव, शेततळे, बंधारे आदी ठिकाणी पाणी अडवूण या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येऊन शेतीला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांनीही यासाठी पुढाकार घेवून जलसंधारणाच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबद्दल बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, कर्जमाफी मिळणाऱ्या तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 15 स्पटेंबर पूर्वी जवळच्या सेतू केंद्रात ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी पहिल्यांदाच 595 कोटी रुपयाची योजना तयार करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ 150 कोटी रुपये उपलब्ध होत होते. रेवराल येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासंदर्भातही पुढाकार घेवून याला केंद्र व राज्य शासनाची परवानगी घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

अध्यक्ष भाषणात आमदार डी. मल्लिाकार्जुन रेड्डी म्हणाले की, ग्रामीण भागात शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत दहा योजनांमध्ये रेवराल येथील योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण विकासासाठी सर्वाधिक निधी प्राप्त झाला असून केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री यांनी दोनशे कोटी रुपयाचा अरोली ते भंडारा या रस्त्याला मंजुरी दिली आहे. कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेला आरओचे पाणी मिळावे यासाठी आमदार निधीमधून शुध्द जलयंत्र बसविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. ही योजना येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी सरपंच श्रीमती मंदा श्रावणकर यांनी स्वागत करुन रेवराल येथील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना केली. ग्रामविकास अधिकारी सी. एस. बेलेकर यांनी स्वागत करुन आभार मानले.

Advertisement
Advertisement