Published On : Tue, Jul 23rd, 2019

जुनापाणी येथील वीज समस्या निकाली लागणार

Advertisement

महावितरणचे काटोल विभागात संवाद मेळावे

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: कोंढाळी जवळील खुर्सापार(जुनापाणी) परिसरातील वीज ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा मिळतो या आशयाची तक्रार येथील वीज ग्राहकांनी महावितरणच्या ग्राहक संवाद मेळाव्यात केली असता महिनाभरात हि समस्या निकाली काढण्याचे या आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संवाद मेळावे घेण्याचे निर्देश दिले होते. यानुसार राज्यात ठिकठिकाणी संवाद मेळावे घेऊन वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात येत आहेत. अनेक तक्रारीवर ताबडतोब निर्णय करून वीज ग्राहकांना महावितरण प्रशासनाकडून दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

महावितरणच्या कोंढाळी उपविभागात येणाऱ्या खुर्सापार (जुनापाणी) येथील वीज ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा मिळतो, अशी तक्रार खुर्सापार येथे आयोजित वीज ग्राहकांच्या मेळाव्यात करण्यात आली. खुर्सापार (जुनापाणी) येथील वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी सुमारे ५०० मीटर लांबीची वीज वाहिनी टाकण्यात येणार आहे. सोबतच या वीज वाहिनीसाठी ४ पोल लागणार असून, सदर काम पूर्ण होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. नरखेड उपविभागात येणाऱ्या बेलोना-खरसोली परिसरात काही ठिकाणी वीज वाहिन्या खाली आल्याने अपघात होऊ शकतो याकडे लक्ष वेधले असता या ठिकाणी भेट देऊन योग्य उपाय योजना करण्यात येईल असे वीज ग्राहकांना सांगण्यात आले.

महावितरणच्या काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काटोल विभागात मागील दोन दिवसात ५ वीज ग्राहकांचे संवाद मेळावे घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. या मेळाव्यात ६० पेक्षा अधिक वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात दाखल केल्या. यात बहुतांश तक्रारी वीज देयकाच्या संदर्भातील होत्या.

या तक्रारीची दखल घेऊन आठवडाभरात यावर योग्य निर्णय घेण्यात येईल असे महावितरणकडून सांगण्यात आले. काटोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गुणवंत पिसे, सावरगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नारायण वैरागडे, नरखेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश राठोड, जलालखेडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र बागडे, कोंढाळी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अशोक गाणार यांनी ठिकठिकाणी मेळावे यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.