Published On : Sat, Dec 15th, 2018

उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी

नागपूर: शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत वीज जोडणी देण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील ३ शेतकऱ्यांना उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत वीज जोडणी देण्यात आली आहे.

कोठीराम पोटभरे, राजेश अलोणे आणि सुरेश सज्जा अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. हे शेतकरी मौदा तालुक्यातील खापरखेडा तेली येथील निवासी आहेत. या शेतकऱ्यांचा शेतात महावितरणने १६ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारून वीज पुरवठा सुरु केला आहे. शेतीसाठी शेतात स्वतंत्र रोहित्र हे या योजनेचे मुख्य वैशिष्ठ असून यामुळे शेतकरी वर्गाला शेतात योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे.याच गावात महावितरणकडून आणखी २ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

महावितरणकडून प्रचलीत पद्धतीनुसार १०० किंवा ६३ एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रा वरून वीज पुरवठा करण्यात येतो. एकाच रोहित्रावरून १५-२० शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत असल्याने कमी दाबाने वीज पुरवठा मिळणे, रोहित्र नादुरुस्त होणे, शेती पंपाची मोटार जळणे या सारख्या समस्या निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला.

उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या शेतात थेट ११ कि व्हो. वाहिनी टाकून विहीर अथवा विंधन विहिरीजवळ रोहित्र उभारून वीज पुरवठा करण्यात येतो. सुरेश सज्जा यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी शेतीपंपासाठी अर्ज केला होता. माझ्या शेतात स्वतंत्र रोहित्र उभारून शेतीसाठी वीज पुरवठा सुरु केल्याबद्दल त्यांनी महावितरणचे आभार मानले . डोमाजी गुरनुले यांच्या शेतात वीज वाहिनी उभारणीचे काम सुरु असून आपली अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी शेती पंपाची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मार्च-२०१८ पर्यंत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनाया योजनेतून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात उच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या शेतात वीज पुरवठा करण्यासाठी ५८ कोटी रुपये खर्च येणार असून या माध्यमातून ४१४६ शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यात येणार आहे. कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी १९ स्वतंत्र निविदा काढून कार्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिली.