Published On : Mon, Feb 12th, 2018

रेल्वेमुळे महावितरणचा वीज पुरवठा बाधीत,पाच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद

Advertisement

नागपूर: महावितरणच्या ३३ किव्हो रोहणा उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या केबलला चणकापूर रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वेसाठी काम करणाऱ्या जेसीबीचा धक्का लागल्याने सुमारे ५ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सोमवारी दुपारी दिड वाजल्यापासून खंडित झाला असून , येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३३ किव्हो रोहणा उपकेंद्राला ३३ किव्हो पाटणसावंगी आणि महादुला उपकेंद्रातुन वीज पुरवठा केल्या जातो. रेल्वेकडून चणकापूर गावाजवळ काम सुरु करण्यात आले पण याची महावितरणला पूर्व कल्पना देण्यात आली नाही. रेल्वेकडून काम करणाऱ्या कंत्रादाराने खबरदारी न घेतल्याने ३३ किव्हो पाटणसावंगी आणि महादुला उपकेंद्रातुन येणाऱ्या वाहिनीला जेसिबीमुळे धक्का बसला. परिणामी इसापूर, रोहणा, वलनी, गोसीवडा या गावातील सुमारे ५००० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.

वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच महावितरणचे खापरखेडा येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत टेम्बेकर, कनिष्ठ अभियंता सुमेध जंगम, सचिन धनविजय यांनी ३३ किव्हो रोहणा उपकेंद्राकडे धाव घेतली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येथील वीज ग्राहक अंधारात होते. तसेच येथील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले. महावितरणच्या सामग्रीचे नुकसान केले म्हणून महावितरणकडून खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.