Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jul 12th, 2019

  इलेक्ट्रिक बस चार्जींग स्टेशन नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल : महापौर नंदा जिचकार

  इलेक्ट्रिक बस चार्जींग स्टेशनचे भूमीपूजन

  नागपूर : विकासाची दुरदृष्टी असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वातून नागपूरचा चौफेर विकास होत आहे. पर्यावरणपूरक वाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीला सबळ करण्याच्या दृष्टीने खास महिलांसाठी सुरू होत असलेली इलेक्ट्रिक बस म्हणजे नागपूरच्या विकासात होत असलेली क्रांती आहे. नागपुरात होत असलेले इलेक्ट्रिक बस चार्जींग स्टेशन हे विदर्भातील पहिले असून नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

  पूर्व नागपुरातील हरीहर मंदिराजवळ उभारण्यात येणा-या इलेक्ट्रिक बस चार्जींग स्टेशनच्या भूमीपूजन समारंभाचे आयोजन शुक्रवारी (ता.१२) करण्यात आले होते. प्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर महापौर नंदा जिचकार यांच्यासह पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नेहरू नगर झोन सभापती समिता चकोले, परिवहन समिती सदस्य राजेश घोडपागे, नितीन साठवणे, सदस्या रूपा रॉय, नगरसेविका मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, कांता रारोकर, मनिषा अतकरे, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, ऑलेक्ट्रॉ ग्रीनटेक लिमिटेडचे उपव्यवस्थापक जी.नटराज आदी उपस्थित होते.

  पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘तेजस्वीनी’ बस लवकरच नागपूरकर महिलांच्या सेवेत दाखल होणार आहे. अशा प्रकारची विदर्भातील ही पहिलीवहिली बस सेवा राहिल. खास महिलांसाठी सुरू होत असलेल्या या बसच्या चालक व वाहक महिलाच असाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. इलेक्ट्रिक बस चार्जींग स्टेशन हे पर्यावरणपूरकेकडे महत्वाचे पउल ठरणार आहे. भविष्यात २०३० पर्यंत देशात एकही वाहन पेट्रोल किंवा डिझेलवर नसणार असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे व्‍हिजन असून त्याची सुरूवात नागपुरातून होत आहे, ही गर्वाची बाब आहे. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात शहराच्या परिवहनाला गती मिळाल्याचेही त्या म्हणाल्या.

  शहराच्या चौफेर विकासात महत्वाची भर : आमदार कृष्णा खोपडे
  पूर्व नागपुरात साकारल्या जाणा-या इलेक्ट्रिक बस चार्जींग स्टेशनमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात शहरात सुरू असलेल्या चौफेर विकासात महत्वाची भर पडली असल्याचे मत यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केले. नागपूर शहरात सर्वच क्षेत्रात आणि सर्वच बाजूने विकासाची कामे होत आहेत. या विकासात समाजातील सर्वच घटकांचा समावेश आहे. पूर्व नागपूरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असलेला विकास हा संपूर्ण देशात पथदर्शी ठरत आहे. भविष्यात नागपूर शहर ‘विकासाचे मॉडेल’ ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

  ना. नितीन गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाउल : जितेंद्र (बंटी) कुकडे
  प्रास्ताविकातून परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी परिवहन समिती आणि परिवहन विभागांतर्गत सुरू असलेल्या लोककल्याणकारी बससेवेचा आणि त्या अंतर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसाठी सुरू असलेल्या योजनांचा उहापोह केला. जिजाउ योजनेंतर्गत शहिद कुटुंबातील महिलांना आपली बसमध्ये मोफत प्रवास योजनेचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. आपली बस सेवेतील ‘तेजस्वीनी’ ही बस सेवा म्हणजे क्रांती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे महत्वाकांक्षी पाउल असेही ते म्हणाले.

  चार्जींग स्टेशनचे बांधकाम ३१ जुलैपर्यंत पूर्ण होईल. या स्टेशनवर सहा इलेक्ट्रिक बसेस चार्जींग होतील. इलेक्ट्रिक बस पुरविणारी कंपनीच चार्जींग स्टेशनचेही संचलन करणार आहे. बसेसचा रंग गुलाबी राहणार असून ह्या बसेच ‘महिला स्पेशल’ राहतील. नागपुरात तयार होणारे इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन विदर्भातील पहिले तर देशातील आठवे स्टेशन असल्याचेही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी सांगितले.

  तत्पूर्वी इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनचे भूमीपूजन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संचालन परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी केले तर आभार परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी श्री. पिंपुर्डे यांनी मानले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145