नागपूर-हिवरीनगरमधील जय भीम चौकात मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंतर्गत केबल टाकण्यासाठी अनेक महिन्यांपासून रस्त्यावर खोदलेले गड्ढे अपघाताचे कारण ठरत आहेत. शुक्रवारी दुपारी अशाच एका गड्ढ्यात एक वृद्ध महिला पडली. गड्ढ्यात साचलेल्या सांडपाण्यात पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत महिलेला बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला.
या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी मेट्रो प्रशासन आणि महापालिकेच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, ट्राफिक जाममुळे आणि कुठलीही सूचना नसलेल्या उघड्या गटारामुळे ही दुर्घटना घडली.
याआधीही मृत्यूची घटना-
हिवरीनगरच्या याच भागात काही महिन्यांपूर्वी एका युवतीचा अशाच गड्ढ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र तरीही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही. गरीब नागरिकांच्या जीविताची सरकारला किंमत नाही, असा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.जर हाच अपघात एखाद्या धनवंत किंवा नेत्याच्या कुटुंबीयांसोबत झाला असता, तर प्रशासन तत्काळ हालचाली करतं. मात्र सामान्य माणसाच्या जीवाला काहीही महत्त्व नाही,” असा संताप सामान्य कार्यकर्ते योगेश जोशी यांनी व्यक्त केला.
प्रशासनाला इशारा-
“तातडीने पूल व केबलचं काम पूर्ण करून मार्ग मोकळा करा, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,” असा इशारा जोशी यांनी दिला आहे.