नागपूर : प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट निर्माती, अभिनेता जितेंद्र यांची मुलगी एकता कपूर लवकरच नागपुरात एक भव्य स्टुडिओ स्थापन करणार आहेत. यामुळे विदर्भातील मनोरंजन आणि सेवा क्षेत्राला मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
गडकरी म्हणाले, “मी अभिनेता जितेंद्र आणि त्यांच्या कन्या एकता कपूर यांना नागपुरात स्टुडिओ उभारण्यासाठी एक जागा दाखवली. त्यांना ती जागा खूपच आवडली असून त्यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकता कपूर यांनी स्पष्ट केलं की नागपूरचं मुंबईशी उत्तम कनेक्टिव्हिटी असल्यामुळे लॉजिस्टिकची अडचण भासणार नाही. त्यामुळे लवकरच नागपुरातही मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होईल.”
याआधी विदर्भात ‘फिल्म सिटी’ उभारण्याचा प्रयत्न तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. आता एकता कपूरच्या स्टुडिओ प्रकल्पामुळे या क्षेत्रात नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे.
पर्यटन क्षेत्रातही मोठी गुंतवणूक – अंभोरा बैकवॉटरसाठी खास योजना
नितीन गडकरी यांनी भंडारा जिल्ह्यातील अंभोरा बैकवॉटर परिसरात पर्यटन वाढवण्यासाठी नव्या योजना जाहीर केल्या. त्यांनी सांगितले की, लवकरच रशियातून आणलेले होव्हरक्राफ्ट्स या ठिकाणी साहसी जलक्रीडांसाठी आणले जाणार आहेत.
गडकरी म्हणाले, “अंभोरा परिसर हे लवकरच एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ होईल. नव्याने उभारण्यात आलेल्या काचेच्या तळाचा पूल आणि रेस्टॉरंटमुळे पर्यटकांची संख्या आधीच वाढली आहे. आता जलआधारित अनेक उपक्रम सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.”
नागपूर-विदर्भाला दिलासा ,पर्यटन आणि रोजगाराची संधी-
विदर्भाच्या नैसर्गिक व मानवी संपत्तीवर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, “पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळू शकतात. या क्षेत्रात सुमारे 49 टक्के गुंतवणूक ही मानवी संसाधनात जाते.” त्यामुळे नागपूर आणि संपूर्ण विदर्भ भाग हा पर्यटन आणि मनोरंजन उद्योगासाठी आदर्श स्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकंदरीत, एकता कपूर यांच्या स्टुडिओ प्रकल्पामुळे नागपूरच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला नवा चालना मिळेल, तर अंभोरा परिसर पर्यटन नकाशावर झळकण्याच्या तयारीत आहे.