नागपूर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आरोग्य सुविधांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळेच रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य झाले. नागपुरातील दवाखान्यांमधील खाटा, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेडच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आठपटीने म्हणजेच 989 बेडवरून 7 हजार 730 बेडची वाढ झाली आहे. त्यामुळे दुसरी लाटेत केवळ एका महिन्यातच नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
मार्च 2020 मध्ये नागपुरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. केवळ महिन्यातच म्हणजे एप्रिल 2020 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 989 वर पोहोचली. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. या महिन्यात (सप्टेंबर 2020) कोरोना रुग्णांची संख्या 3454 एवढी होती. मात्र दुसरी लाट ही नागपूरसाठी अधिक घातक ठरली. मार्च महिन्यात रुग्ण संख्या 4682 तर एप्रिल महिन्यात 7632 वर पोहोचली होती. कोरोना रुग्णांच्या संख्येत एव्हढी वाढ झाल्यानंतरही नागपुरातील रुग्णांना बेड, ऑक्सीजन व व्हेंटीलेटरची सुविधा न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या नाहीत.
पहिल्या लाटेत या महामारीच्या एकूण तीव्रतेची कुणालाच कल्पना आली नव्हती. त्यामुळे देशात आणिबाणीची स्थिती अधिक होती. परंतु हळूहळू या रोगाची लक्षणे व त्यावरील उपायाची माहिती तज्ज्ञांना ज्ञात झाल्यानंतर उपाययोजना सुरू झाल्या. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पहिल्यांदा टास्क फोर्सची निर्मिती करून तज्ज्ञांना विश्वासात घेतले. यासोबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना निर्देश देऊन आरोग्य सुविधांमध्ये तात्काळ वाढ करण्याचे निर्देश दिले. शहरातील खासगी डॉक्टरांशी केवळ चर्चा केली नाही तर खासगी दवाखान्यांमध्ये वाढीव बेडची मागणी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
गेल्या एप्रिल महिन्यात नागपुरात केवळ 989 रुग्णांसाठी बेड नागपुरात होते. यात आठपटीपेक्षा अधिक बेडची आता भर पडली 30 मे 2021 मध्ये नागपुरातील बेडची संख्या 7730 एवढी झाली आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सीजनची सर्वाधिक गरज पडली. एप्रिल 2020 मध्ये नागपुरात केवळ 805 ऑक्सीजन बेड होते. आता ऑक्सीजन बेडची संख्या 4810 एवढी आहे. आयसीयूमध्ये बेड मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 92 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नागपुरात आयसीयू बेड केवळ 184 होते. आता या बेडची संख्या 2314 वर पोहोचली आहे. नागपुरात गेल्या वर्षी व्हेंटीलेटरची संख्या केवळ 87 होती. आता व्हेंटीलेटर 579 एवढे उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सीजन गरज अधिक लागली. एप्रिल 2020 मध्ये नागपुरात केवळ 58 मेट्रीक टन ऑक्सीजनचा पुरवठा होता. आता नागपुरात 160 मेट्रीक टन ऑक्सीजनची निर्मिती होत आहे.
कोरोना लाटेची तीव्रता लक्षात घेऊन आरोग्य सुविधा अद्यावत करण्याची आवश्यकता होती. नागपुरात केवळ शहरातीलच रुग्ण येत नाही तर इतर जिल्ह्यातून तसेच छत्तीसगड व मध्यप्रदेशातून रुग्ण येत असल्याने नागपुरातील आरोग्य यंत्रणेवर निश्चितपणे ताण पडत असतो. यासाठी आरोग्य सुविधा भक्कम करणे हाच यावर उपाय होता. यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयांतील खाटांची संख्या वाढविली. त्याचप्रमाणे काही खासगी संस्थांच्या रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिल्याने रुग्णांची बरीच सोय झाली. या आरोग्य सुविधांमध्ये तात्काळ वाढ झाल्याने रुग्णांवर
उपचार करणे सोपे झाले व दुसरी लाट लवकरच आटोक्यात आली.
हे यश सर्वांचे -डॉ. नितीन राऊत
कोरोना या रोगामुळे आपण सर्व जण अत्यंत काळजीत आहोत. परंतु येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे व त्या भक्कम करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. यासाठी सर्व अधिकारी व आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त् केले आहे. मात्र आताही बेसावध राहू नये नियोजन सक्त असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
केवळ एक वर्षाच्या कालावधीत आरोग्य सुविधांमध्ये आठपटीने वाढ करणे ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु महाविकास आघाडीचे धोरण व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यात जे काही यश मिळाले ते या सर्वांचे आहे, असेही ते म्हणाले.