Published On : Mon, Mar 8th, 2021

सर्व प्रभागातील मुलभूत विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करणार : भोयर

Advertisement

– नवनिर्वाचित स्थायी समिती सभापतींचे पदग्रहण

नागपूर : मागील वर्षभराच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शहरातील विकास कामांना खिळ बसली. प्रभागातील नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या सोडविण्यासही नगरसेवकांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे येणारा काळ आव्हानात्मक असला तरी शहरातील सर्व प्रभागांमध्ये आवश्यक मुलभूत कामांना प्राधान्य देउन ते सोडविण्याबाबत गती प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असा विश्वास नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी व्यक्त केला.

स्थायी समितीचे सभापती म्हणून अविरोध निवड झाल्यानंतर मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभापती कक्षामध्ये औपचारीक पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आमदार अनिल सोले, मावळते स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर नंदा जिचकार, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, नासुप्र चे माजी विश्वस्त भूषण शिंगणे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, विधी समिती सभापती मिनाक्षी तेलगोटे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती दीपक चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सर्वश्री अभय गोटेकर, भगवान मेंढे, निशांत गांधी, नागेश सहारे, नागेश मानकर, नगरसेविका मंगला लांजेवार, नसीम बानो इब्राहिम खान, सोनाली कडू, विशाखा बांते, उज्ज्वला शर्मा, वनिता दांडेकर, रिता मुळे, भारती बुंडे, लता काडगाये, रुपाली ठाकुर, स्वाती आखतकर, जयश्री रारोकर, सुमेधा देशपांडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर म्हणाले, १९८७-८८ पासून भारतीय जनता पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केले. पुढे विविध जबाबदा-या पक्षाने सोपविल्या त्यांना प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. २००२ला पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक लढविली, मात्र त्यात अपयश आले. पुढे २०१७च्या निवडणुकीत यश मिळाले. या पहिल्याच वर्षी पक्षाने लक्ष्मीनगर झोन सभापतीपदाची जबाबदारी सोपविली. पक्षाने दाखविलेला विश्वास पुढे सलग चार वर्ष कायम ठेवला. आज पाचव्या व शेवटच्या वर्षी मनपाच्या स्थायी समिती सभापती पदाची मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली आहे. वेळोवेळी टाकलेल्या विश्वासाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्यासह सर्व पक्षश्रेष्ठींचा आभारी असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

सर्व पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास कायम ठेवून मावळते स्थायी समिती सभापती विजय झलके यांच्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेली कामे, अनेक प्रकल्प पुढे नेउन तसेच, शहरातील तळागाळातील नागरिकांपर्यंत त्यांच्या मुलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी सर्व अनुभवी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, २०१७मध्ये मनपामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिले स्थायी समिती सभापती म्हणून संदीप जाधव यांना जबाबदारी देण्यात आली होती व शेवटच्या वर्षी ती जबाबदारी प्रकाश भोयर यांच्याकडे आली आहे. एकूणच सुरूवातीला लागलेला विकासाचा, यशाच्या दीपाच्या प्रकाश हा पुढेही निरंतर राहिल, हा विश्वास यामधून प्रतीत होतो.

मावळते स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अडचणी असतानाही लोकहिताच्या २७६ कोटींच्या कामाला मंजुरी मिळवून दिली. पक्षश्रेष्ठींद्वारे दाखविण्यात आलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी महत्वाची कामे, प्रकल्प, संकल्पना मांडल्या. त्या कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पूर्ण होउ शकल्या नाहीत. आता त्याच कामांना पुढे घेउन जनहिताची नवीन कामेही करण्याचे आव्हान प्रकाश भोयर यांच्यावर आहे. सलग चार वर्ष लक्ष्मीनगर झोन सभापती म्हणून कामकाज पाहिलेले प्रकाश भोयर अनुभवी व वाणिज्य विषयात पदवीधर आहेत. त्यांच्या शैक्षणिक, राजकीय व प्रशासकीय अनुभवाचा फायदा निश्चितच येत्या काळात मनपाला होईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

मावळते सभापती विजय (पिंटू) झलके यांनी यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अडचणी आणि त्यावर सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या मदतीने केलेली मात याचे विवेचन केले. ६ मार्च २०२० रोजी समितीचा सभापती म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर २२ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाले. अशा काळात मनपाच्या अर्थसंकल्पात अनेक बाबींचा समावेश होता मात्र त्याची पूर्ती होउ शकली नसल्याचे दु:ख आहे. मनपाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या योजना राबविता आलेल्या नाहीत. मात्र काही प्रमाणात तरी उत्पन्न वाढीत यश आल्याचे समाधान आहे, असेही ते म्हणाले.

नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर हे अनुभवी आणि सुक्ष्म नियोजन असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सर्वांच्या सहकार्याने मागील कामांना गती मिळून जनतेच्या हिताची अनेक कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यासोबतच सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे व माजी आमदार अनिल सोले यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी मावळते स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी प्रकाश भोयर यांच्याकडे पदभार सोपविला.

कार्यक्रमाचे संचालन मनपातील परिवहन समितीचे सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले.