नागपूर: देशाचे संविधान आतापर्यंत सुरक्षित राहिले असले तरी ते असुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी धर्म आणि हिंसेचा मार्ग वापरला जात असून हिंसेतून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपुरात दीक्षाभूमीवर बोलताना केली.
दक्षिणायन च्या वतीने सुप्रसिद्ध ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने नागपुरात दीक्षाभूमीवरून संविधान बचाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र बचाव मूक मोर्चा काढण्याता आला. या मूक मोर्चात महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी, प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी प्रामुख्याने सहभागी झाले होते. दीक्षाभूमीवरून या मूक मोर्चाची सुरुवात होण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने लोकांमध्ये संविधान तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
देशाच्या संविधानावर हल्ला करून त्याला इजा पोहोचविण्याचे प्रयत्न देशपातळीवर सुरु आहेत. त्यानिमित्ताने शांतता आणि बंधुभावावर हल्ला होतो आहे. द्वेशाचे वातावरण देशात पसरविण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. संविधानाच्या मूळ तत्वांना धोका पोहोचवून पुन्हा मनुवाद आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हिंसाचार घडवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याविरोधातील हा अहिंसात्मक संघर्ष आहे, असे आंबेडकर म्हणाले. आज देशात बळजबरीचे वातावरण तयार होत असल्याची टीका महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी यांनी यावेळी बोलताना केली. सामान्य माणसावर बळजबरी होत आहे. विचारस्वातंत्र्यावर गदा येते आहे. संविधानावर हल्ला होतो आहे. अशावेळी सर्व विचारी लोकांनी एकजूट होऊन या विरोधात आवाज उठविण्याची ही वेळ असल्याचे गांधी म्हणाले.
डॉ. आंबेडकर थांबलेल्या स्थळाला भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली होती. त्यावेळी सेवाग्राम गावात जाऊन ते जेथे थांबले होते त्या ठिकाणी सकाळी राजमोहन आणि प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन गावातील लोकांशी चर्चा केली. महात्मा गांधी यांच्या बापू कुटीला गांधी-आंबेडकर परिवारातील वंशजांनी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
