Published On : Tue, Aug 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मनपातर्फे ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव’ स्पर्धा

आमचा बाप्पा - इको-फ्रेंडली अभियान अंतर्गत 25 ते 28 ऑगस्टपर्यंत नोंदणी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “आमचा बाप्पा – इको-फ्रेंडली अभियान” या संकल्पनेवर आधारित स्पर्धेत शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, तसेच येत्या २८ ऑगस्टपर्यंत मोठ्या संख्येत नोंदणी करावी असे आवाहन मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेअंतर्गत विविध विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. व अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या देखरेखीत मनपा प्रशासन पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कार्य करीत आहे. यात विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे. प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विजेत्यांना 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या 21 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना 11 हजार रुपयेचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट दहा गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जातील. गणेशोत्सव मंडळांना क्युआर कोड स्कॅन करून किंवा या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd9OdXjCT-WouZ8Zb1eeWXqGnJjD9tyOKvlX8RWky99wLiiQA/viewform?pli=1 गुगलफार्म भरुन स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. असे मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्पर्धेत सहभागी होण्याचे निकष

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळासाठी मंडपांचे निकष ठरविण्यात आले आहेत. यामध्ये कचऱ्याचे योग्य विलगीकरण(प्लास्टिक, कपडे, निर्माल्य, ई-कचरा इत्यादी स्वतंत्र डब्यांमध्ये करणे), दहा दिवसांत संकलित प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण (किलोमध्ये वजन नोंदवणे), मंडप सजावटीसाठी पर्यावरणपूरक तंत्रांचा वापर (प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे), नागपूर महानगरपालिकतर्फे तयार केलेल्या नियमांचे पालन, मंडपात नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ची स्थापना (उदा. मातीपासून बनवलेल्या मूर्ती), मंडप परिसरातील स्वच्छता राखणे, स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे फलक/बॅनर लावणे इत्यादी निकष स्पर्धेकरिता असणार आहे.

निर्माल्य आणि प्लास्टिक संकलन करिता विशेष वाहन

नागपूर महानगरपालिकेतर्फे या गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य व प्लास्टिक संकलनासाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. या वाहनामध्ये निर्माल्याचे व प्लास्टिकचे संकलन करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येणार आहे. तसेच मनपातफे गणेशोत्सव मंडळाचे निरीक्षण करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात येईल. हे पथक प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचे निरीक्षण करून मनपाने निश्चित केलेल्या निकषानुसार मुल्यांकन करेल.

Advertisement
Advertisement