Published On : Mon, Aug 9th, 2021

पूर्व व मध्य नागपुरात वाहतूक पोलिसांची सक्तीची वसुली थांबणार

Advertisement

चौक सोडून वसुली करणे चुकीचेच : पोलीस उपायुक्त (वाहतूक)

वाहतूक पोलीस उपायुक्त यांचेकडे आ.कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांची बैठक


नागपूर : ट्राफिक पोलीस व्दारा डिप्टी सिग्नल रेल्वे क्रासिंग, प्रजापती नगर, पारडी, जुना मोटार स्टँड, मारवाडी चौक, महाल व अन्य अनेक ठिकाणी चौकातील वाहतूक नियंत्रण सोडून अन्य जागेवर वसुली करताना दिसतात. इतकेच नव्हे तर किरकोळ कारणावरून सक्तीने वसुली करण्याचे अनेक प्रकरण समोर आले आहे. पारडी येथील मनोज ठवकर प्रकरण याचे उदाहरण आहे.

त्यामुळे अशाप्रकारे होत असलेली वसुली तात्काळ थांबवा, या मागणीसाठी आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आज पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी आपले कार्यालयात बैठक बोलावली, या बैठक पूर्व व मध्य नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावर वाहतुक पोलिसांना कोणतेही टार्गेट दिलेले नाही व चौक सोडून उभे राहणे चुकीचे असल्यामुळे अशा प्रकारची वसुली आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त यांनी बैठकीत दिले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी बैठकीत सांगितले की, डिप्टी सिग्नल व पारडी या भागात मोठ्या प्रमाणात मजूर वर्गाचे वास्तव्य आहे. कळमना मार्केटवरून भाजीपाला, धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूची वाहतुक छोट्या चारचाकी वाहनाने होते. ट्राफिक पोलीस या वाहनांना विशेषकरून टार्गेट करतात. अनेक नागरिक सकाळच्या वेळी आपल्या कामावर जात असताना दुचाकी वाहनांना टार्गेट केले जाते. पारडी भागात आधीच ब्रिजच्या कामामुळे वाहनचालक भयभीत असतात, अशा परिस्थितीत या वाहनचालकांना वाटेल तिथे थांबवून वसुली करणे योग्य वाटत नाही. तसेच मध्य नागपूरातील महाल व गांधीबाग परिसरात अशाच प्रकारची वसुली केली जाते.

पोलीस कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र ज्या ठिकाणी ट्राफिक सिग्नल/ सी.सी.टी.व्ही. त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करावी. मजूरवर्ग व छोट्या मालवाहक गाड्यांना या लॉकडाऊनच्या काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून या अन्यायापासून मुक्त करावे. त्याचप्रमाणे या दोन वर्षाच्या काळात लॉकडाऊनमुळे नागरिक हलाकान झाले असून कारवाई पासून वाचण्याच्या नादात अनेक घटना होत असतात. त्यामुळे पोलिसांनी मानवता राखून कारवाई करावी, सक्तीने वसुली थांबवावी. अशी मागणी आमदार खोपडे यांनी बैठकीत केली.

वाहतूक पोलिसांची ड्युटी रात्री 9 पर्यंतच, दुचाकी-तीनचाकी वाहनांना थांबविणे चुकीचे

वाहतूक पोलिसांना कोणतेही टार्गेट दिलेले नाही. टार्गेटच्या नावावर वसुली करणा-या पोलिस कर्मचा-यावर कारवाई होणार. वाहतूक पोलिसांची ड्युटी रात्री 9 पर्यंतच असते, त्यानंतर कसलीही वसुली होणार नाही. तसेच दुचाकी व तीनचाकी वाहनांना थांबवू नये, असे सक्त निर्देश पोलीस उपायुक्त सागर आव्हाड यांनी या बैठकीत दिले.

यावेळी संजय अवचट, प्रमोद पेंडके, नगरसेवक दिपक वाडीभस्मे, प्रदीप पोहाणे, संजय महाजन, जे.पी.शर्मा, राजेश ठाकूर, अजय मरघडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.