Published On : Fri, Oct 12th, 2018

गांधी विचारांवर चर्चासत्र, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव रविवारी

Advertisement

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवी वर्षानिमित्त स्वयम् सामाजिक संस्था, माय करिअर क्लब आणि जागतिक अहिंसा दिन आयोजन समितीच्या वतीने इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्याथ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. ‘गांधी विचार : आजची गरज’ या विषयावरील या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा आणि गांधी विचारांवर चर्चासत्र रविवारी (ता. १४ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता दत्तात्रेयनगर येथील महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक लीलाताई चितळे असतील, तर सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक चंद्रकांत वानखडे हे गांधी विचारांवर व्याख्यान देतील. माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. विशेष अतिथी म्हणून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे आणि डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित राहतील.

इतिहासाच्या अभ्यासातून अनुभवसंपन्न पिढी घडावी, महापुरुषांच्या जीवनचरित्रापासून प्रेरणा घेऊन आदर्श जीवनाकडे वाटचाल करावी, विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमतेसह लेखनकौशल्य विकसित व्हावे, या हेतूने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३० शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून, ६५० विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केलेले आहे. यापैकी सर्वोत्कृष्ट १० विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन या सोहळ्यात गौरव करण्यात येईल, तर प्रत्येक शाळेतील ३ विजेत्यांना सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.