Published On : Mon, May 10th, 2021

‘म्यूकॉरमायकॉसिस’पासून बचावासाठी त्वरीत निदान व वेळीच उपचार आवश्यक

‘कोव्हिड संवाद’मध्ये कान,नका, घसा रोग तज्ज्ञांचा सल्ला

नागपूर : कोरोनाच्या या संकटामध्ये ‘म्यूकॉरमायकॉसिस’ या आजाराची भर पडल्याने वैद्यकीय क्षेत्रापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांनाच अधिक जास्त काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘म्यूकॉरमायकॉसिस’ हा जुनाच आजार असला तरी अलीकडच्या काळात त्याचा प्रकोप वाढला. विशेषत: कोरोना होउन गेलेले रुग्ण व कोरोनाबाधित या दोघांनाही या आजाराचा धोका संभावतो. चेह-यावर सूज येणे, चेह-याचा भाग दुखणे, डोळ्यावर सूज येणे, डोके दुखणे, दृष्टीबाधा होणे, तोंडामध्ये सूज येणे, दात दुखणे, हलणे अशी ‘म्यूकॉरमायकॉसिस’ची सामान्य लक्षणे दिसून येतात. कोव्हिडच्या या संकटामध्ये या दुस-या संकटापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा हा मोठा उपाय आहे. मात्र यासोबतच यामधून सुखरूप बाहेर निघता यावे यासाठी त्वरीत निदान व वेळीच उपचार हे अत्यावश्यक आहे, असा सल्ला शहरातील प्रसिद्ध कान, नाक, घसा शल्य चिकित्सक डॉ. शैलेश कोठाळकर व डॉ. समीर चौधरी यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

Advertisement

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता.१०) डॉ.शैलेश कोठाळकर आणि डॉ.समीर चौधरी यांनी ‘कोव्हिडनंतर उद्भवणा-या समस्या : म्यूकॉरमायकॉसिस’ या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.

सध्याच्या या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये ‘म्यूकॉरमायकॉसिस’ची रुग्णवाढ ही खूप वाईट गोष्ट आहे. ‘म्यूकॉरमायकॉसिस’ हा बुरशीजन्य आजार असून तो झपाट्याने वाढणारा आजार आहे. यापासून सजग राहणे आज प्रत्येकाला आवश्यक आहे. नाकातून पाणी येणे, नाक बंद होणे, डोके दुखणे, चेह-यावर सूज येणे, डोळ्यासंबंधी किंवा टाळूसंबंधी वेदना आदी लक्षणे दिसताच त्वरीत कान, नाक, घसा तज्ज्ञांना भेटा. ‘म्यूकॉरमायकॉसिस’हा आजार मोठा आहे व यावरील उपचार सुद्धा खर्चीक आहे. उपचारापेक्षा औषधांवर होणारा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे आजार वाढू न देता त्वरीत निदान करून वेळेवर उपचार सुरू करावे, असेही डॉ.शैलेश कोठाळकर आणि डॉ. समीर चौधरी म्हणाले.

विशेषत: मधुमेहाचा त्रास असणा-या रुग्णांनी ‘म्यूकॉरमायकॉसिस’पासून सतर्क राहण्याची गरज आहे. सुगर वाढली की ‘म्यूकॉरमायकॉसिस’चा धोका जास्त संभवतो. त्यामुळे मधुमेहबाधित रुग्णांनी कुठलिही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत घान, कान, घसा तज्ज्ञांकडे जाउन सल्ला घ्यावा. आजाराची तीव्रता पाहून डॉक्टरांमार्फत उपचार केले जातात. या आजारामध्ये लवकर उपचार हेच बरे होण्याचे मोठे शस्त्र आहे. जंगलातील वणव्याप्रमाणे झपाट्याने हा आजार पसरतो. नाकापासून सुरू होणारा आजार मेंदूत जाउन जीवाला धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे प्राथमिक स्तरावर कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कोरोनासंबंधी शासनाने जारी केलेल्या सर्व नियमावलीचे पालन करा, असे आवाहनही डॉ.शैलेश कोठाळकर आणि डॉ. समीर चौधरी यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement