Published On : Mon, Jul 1st, 2019

प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करा

Advertisement

महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन : मनपातर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

नागपूर: आज दिवसेंदिवस प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. पाण्याअभावी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वत्र वृक्ष लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारनेही पुढाकार घेतला आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेने सहभाग दर्शविला असून नागरिकांनीही वृक्षारोपणासाठी पुढे येण्याची गरज आहे. वृक्ष लागवडीसह त्याचे जतन करणेही आवश्यक असून प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Advertisement
Advertisement

कृषी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सोमवारी (ता.१) नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. याअंतर्गत महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शास्त्री लेआउट उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, विष्णू ढोरे, दिलीप लकडे, राजू हुकरे, गोविंद बोबडे, अमरसिंग जेररिया, महेंद्रकुमार लोढा आदी उपस्थित होते.

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शहरात ८० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे लावण्याचे कार्य सोपे असले तरी ती जगविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी नागरिकांनी कर्तव्य भावनेतून वृक्ष संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे. वृक्ष संवर्धनासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘महापौर वृक्षमित्र’ ओळखपत्र प्रदान करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ‘महापौर वृक्षमित्र’ ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

पिवळी मारबत चौकात उपमहापौरांनी केले वृक्षारोपण
पिवळी मारबत चौक तांडापेठ रेल्वे फाटक मार्गावर उपमहापौर दीपराज पार्डीकर व नगरसेविका शकुंतला पारवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडुलिंबासह इतर प्रजातीची एकूण ६० झाडे लावण्यात आली. याप्रसंगी उद्यान निरीक्षक अनंत नागमोते, जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, माजी नगरसेवक कल्पक भनारकर, माजी नगरसेविका गीता पार्डीकर, हाजी अब्दुल कदीर, नानाभाऊ उमाठे, सोनू वर्मा, विजय फुलसुंगे, संजय उरकुडे, विशाल लारोकर, उत्तम भेंडे, राजेश साळवे, प्रवीण धकाते, विजय खंडे, शेखर कडवे, प्रीतम बोकडे, मंगेश सुरमवार, रमेश कोरडे, सुनील जवादे, पुष्पा पाठराबे, नसीम खान, श्रीमती बेले, श्रीमती हिवराळे उपस्थित होते.

लेडीज क्लब चौकात प्रगती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
लॉ कॉलेज चौक ते लेडीज क्लब चौक मार्गावर नगरसेविका प्रगती पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, अनुसया काळे छाबरानी, ग्रीनर इंडियाचे सचिन नायडू, वर्षा माहेश्वरी, प्लाँट ॲम्ब्युलन्सचे जतींदर पाल सिंग, शरद पालीवाल, शशांक कुळकर्णी, मनीष हारोडे, श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

या उपक्रमाला नागरिकांनीही सहकार्य दर्शविले असून ग्रीनर इंडियाचे सचिन नायडू यांनी लेडीज क्लब ते लॉ कॉलेज चौक मार्गावर स्वखर्चाने वृक्षारोपण करून त्याला ट्री-गार्ड लावले. मनपाकडून ज्या ठिकाणी वृक्ष लागवडीची परवानगी दिली जाईल त्या ठिकाणी वृक्षारोपण करून ते जतन करण्याचा संकल्प ग्रीनर इंडियाचे सचिन नायडू यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय वर्षा माहेश्वरी यांनी सिव्हील लाईन्समधील झाडांकरीता शंभर ट्री-गार्ड उपलब्ध करून दिले. पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांचे मनपातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

एकूण ८११ रोपट्यांची लागवड
याव्यतिरिक्त मनपाच्या दहाही झोनअंतर्गत विविध ठिकाणी एकूण ८११ रोपट्यांची लागवड करण्यात आली. लक्ष्मी नगर झोन अंतर्गत हिंदुस्थान कॉलनी उद्यानात २५ व शास्त्री लेआउट उद्यानात १४, धरमपेठ झोनमधील लॉ कॉलेज चौक ते जॅपनीस उद्यान दरम्यान १२, हनुमान नगर झोन अंतर्गत स्वराजनगर उद्यानात ५०, धंतोली झोनमधील महात्मा फुले उद्यान सुयोगनगर येथे ३३, नेहरूनगर झोनमधील आयुर्वेदिक लेआउट उद्यानात १० व नंदनवन पोलिस स्टेशन उद्यानात २०, गांधीबाग झोनमधील गांधीबाग उद्यानात ४७, सतरंजीपूरा झोन अंतर्गत पाचपावली व मध्य नागपूरच्या विविध मार्गांवर ४०, लकडगंज झोनमधील म्हाडा कॉलनी उद्यानात ४००, आसीनगर झोनमधील दीक्षित नगर उद्यानात ५०, मंगळवारी झोनमधील मंगळवारी उद्यानात २५ यासह श्रीमती भुरे घरकुल को.ऑप. सोसायटी अंबिका नगर बेलतरोडी येथे ८० अशी एकूण ८११ झाडे सोमवारी (ता.१) लावण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement