
नागपूर : शहरातील पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. कोराडी येथील आपली बस ई-बस डेपोमध्ये मनपाच्या वीज विभागाने स्वतःच्या प्रयत्नांतून 33 केव्ही/0.433 केव्ही क्षमतेचे आधुनिक सबस्टेशन उभारले असून, त्याचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते पार पडले.
महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वाखाली, परिवहन व्यवस्थापक राजेश भगत यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. हे मनपाच्या इतिहासातील पहिलेच असे उच्चदाब सबस्टेशन ठरले आहे, ज्यामुळे ई-बस व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे.
‘पंतप्रधान ई-बस सेवा योजना’ अंतर्गत नागपूरला मिळणाऱ्या १५० ई-बसपैकी ७५ बस कोराडी डेपोमधून आणि ७५ बस खापरी डेपोमधून रस्त्यावर उतरतील. कोराडी डेपोतील नव्या सबस्टेशनमुळे बस चार्जिंगसाठी स्थिर व अखंड वीजपुरवठा उपलब्ध राहील. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनण्यास मोठी गती मिळेल.









