Published On : Fri, Mar 22nd, 2019

निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई

नागपूर : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जाहीर झाल्या असून नागपूर शहरात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष व निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता भंग होवू नये यासाठी शस्त्रास्त्र, हत्यारे, दारुगोळा याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे असे शस्त्रास्त्र सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (अ) अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालामत्तेच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्याकडील सुरक्षाकाकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील शस्त्रांचा/हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक/संस्थेच्या अधिकाऱ्यावर राहील, असेही सह पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.

हा मनाई आदेश ज्या समाजास त्यांच्या दीर्घकालीन स्थाई कायदा रुढी व परंपरा यानुसार शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. अशा समाजातील व्यक्तीचा हिंसाचारात सहभाग आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेस बाधा आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पडण्यास अडथळा निर्माण झाल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्र अडकवून ठेवण्याचा प्रशासनास अधिकारी राहील. हा आदेश 27 मे 2019 पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये करावाईस पात्र ठरतील, असेही सह पोलीस आयुक्त रविंद्र कदमी यांनी कळविले आहे.