कार्यकर्त्यांमुळे मी मोठ्या पदांपर्यंत पोहोचलो : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

नागपूर: कार्यकर्त्यांमुळे मी पक्षात मोठ्या पदांपर्यंत पोहोचलो आहे. पक्षाने मला खूप दिले आहे. गेली 20 वर्षे मी या मतदारसंघात काम करताना सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन काम करीत आहे. समाज व परिवार जोडण्याचे काम मी केले. ही निवडणूक विकासाची असल्याने नागरिकांनी विकास करणार्‍या पक्षासोबत राहावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी येथे केले.

ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे बहुजन रिप. एकता मंचातर्फे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला माजी मंत्री व ड्रॅगन पॅलेसच्या सर्वेसर्वा अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने बरिएमं व भाजपाचे कार्यकर्ते येथे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- मी आमदार झाल्यापासून सुलेखाताई माझ्यासोबत आहेत. आजही त्यांच्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो. देश आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहे. ज्या देशांनी हा विचार स्वीकारला ते देश पुढे निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 व्या शतकातील मजबूत भारत निर्माण करीत आहेत. अमेरिकेत त्यांनी ही कल्पना मांडली तेव्हा तेथील अध्यक्षांनी पंतप्रधान मोदी यांना विश्वाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले व्यक्तित्व या शब्दात पंतप्रधान मोदींचा गौरव केला, याकडेही पालकमंत्री बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.

अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे
भारतीय जनता पक्ष आता पूर्वीचा राहिला नाही. हिंदू, दलित, शोषित, मुस्लिम आणि गरीबांचा विकास करणारा सर्वसमावेशक पक्ष झाला असल्याचे प्रतिपादन बरिएमंच्या संयोजिका अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले. आमचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम या पक्षाने केले असल्याचे सांगताना अ‍ॅड. सुलेखाताई म्हणाल्या- शासनाच्या ज्या योजना येतात, त्या आपल्या मतदारसंघात राबविल्या पाहिजे या तडफेने बावनकुळे काम करीत आहेत व त्यांनी या योजना आणल्या आहेत. यापूर्वी जे कुणी करू शकले नाही, ते बावनकुळे यांनी कामठीसाठी करून दाखविले आहे.

काँग्रेसच्या काळात ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी मी 5 कोटींची मागणी केली होती. पण अजूनपर्यंत ते मिळाले नाही. याउलट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळे यांनी येथील विकास केला. शिवाय 215 कोटींचा विकास आराखडा मंजूर केल्याचे सुलेखाताई यांनी सांगितले. या निवडणुकीत माझा चंद्रशेखर बावनकुळे यांना विनाशर्त पाठिंबा असून कार्यकर्त्यांनीही बावनकुळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली.