नागपूर: सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत मोठा ताजबागजवळील जाफरी रुग्णालय परिसरात मद्यधुंद अवस्थेत बेकायदेशीर अनियंत्रित रुग्णवाहिका चालविताना चालकाने दोघांना उडविल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. संदेश सुटे असे आरोपी चालकाचे नाव आहे.
माहितीनुसार, संदेश याने बेलापूर पोलीस ठाण्यातून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणला होता आणि त्याचवेळी त्याने आधी रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाला उडवले व नंतर अन्य एका अज्ञात व्यक्तीला धडक दिली. या अपघातानंतर आरोपी वाहन चालकांना नागरिकांनी पकडले आणि चांगलाच चोप दिला. घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये ई-रिक्षाचालक सलीम शेख रमजान याचा मृत्यू झाला तर अन्य एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या भीषण घटनेची फिर्याद मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.