
नागपूर : नागपूर शहर पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर” या विशेष मोहिमेअंतर्गत धंतोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी नुकतेच तुरुंगातून सुटलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारांसह एम.डी. पावडरसह रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धंतोली पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहिती मिळाली की, डॉक्टर कॉलनीजवळील डी.पी. रोड परिसरात काही जण अंमली पदार्थांची तस्करी करत आहेत. पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता तीन संशयित तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यांना त्वरित ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींची ओळख प्रदीप पुरनदास उईके, चिंटू उर्फ विवेक लेखराज बनोटे, आणि तेजस विजय भंडारकर अशी झाली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी १० ग्रॅम एम.डी. पावडर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दोन चाकू, पाच मोबाईल फोन आणि स्विफ्ट कार असा एकूण ₹८,७३,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस तपासात उघड झाले की, प्रदीप उईके हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्या प्रयत्न आणि एम.डी. ड्रग्स तस्करी यांसारखे तब्बल सात गुन्हे आधीपासूनच नोंद आहेत. तो अवघ्या १५ दिवसांपूर्वीच हत्या प्रयत्नाच्या प्रकरणात तुरुंगातून बाहेर आला होता आणि सुटल्यानंतर लगेचच पुन्हा ड्रग्स तस्करी सुरू केली होती.
घटनेच्या दिवशी तो आपल्या साथीदारांसह एम.डी.ची डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता, पोलिसांनी तिघांनाही रंगेहात पकडले. दरम्यान, या दोन्ही साथीदारांचा देखील आपराधिक रेकॉर्ड असल्याचे समोर आले आहे. पोलिस आता या तिघांना एम.डी. पुरवठा करणाऱ्या मोठ्या तस्करांचा शोध घेत आहेत.








