Published On : Mon, Aug 17th, 2020

‘नशामुक्त भारत मोहिमेला सुरुवात’

नागपूर: नशामुक्त भारत कॅम्पेनचा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभा कक्षामध्ये प्रारंभ करण्यात आला. नशामुक्त भारत कॅम्पेन 32 राज्यांमध्ये राबविण्यात येत असून यामध्ये 272 जिल्हयांचा समावेश आहे. या कॅम्पेनला स्वातंत्र्यदिनापासून सुरवात झाली असून ते 31 मार्च 2021 पर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यामध्ये नागपुरसह मुंबई, पूणे व नाशिक येथे हे कॅम्पेन राबविण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी नशामुक्त भारत कॅम्पेन राबविण्यात येत आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, पोलिस निरीक्षक (जिल्हा विशेष शाखा) जगदीश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शाम जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रकाश कांचनवार, शिक्षणाधिकारी डॉ.शिवलिंग पटवे, समाजकल्याण अधीक्षक प्रविण मोंढे आदी यावेळी उपस्थित होते.


समाजामध्ये वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी शाळा, महाविद्यालये येथे ‘नशामुक्त भारत कॅम्पेन’व्दारे विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातील. व्यसनाधीन नागरिकांनी समुपदेशन करण्यात येईल. व्यसनमुक्ती केंद्रातील स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘नशामुक्त भारत कॅम्पेन’ अंतर्गत शासनाने प्राधिकृत केलेल्या स्वयंसेवी संस्थांची समिती यावेळी स्थापन करण्यात आली. यामध्ये प्रियदर्शनी चॉरिटेबल सोसायटी, मधुर व्यसनमुक्ती केंद्र, स्नेह बहुउद्देशीय संस्था, भारतीय आदीम जाती सेवक संघ, हर्षल बहुउद्देशीय संस्था तर उमरेड येथील अनिकेत बहुउद्देशिय संस्थेचा समावेश करण्यात आला.

व्यसनाच्या विळखात सापडलेल्या युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी नशामुक्त भारत कॅम्पेन व्दारे निश्चितच मदतनीस ठरेल असा विश्वास श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला.