Published On : Fri, Sep 20th, 2019

तोतलाडोह प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे दोन वर्षे पुरेल एवढे शहराला पिण्याचे पाणी

Advertisement

नागपूर: तोतलाडोह सिंचन प्रकल्प 2013 नंतर पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच 1 हजार 017 दलघमी म्हणजेच 100 टक्के भरला असून मृतसाठ्यातून नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पातून आता पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यासोबतच 1 लक्ष 4 हजार हेक्टर क्षेत्रालाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्प पूर्ण भरल्यानंतर 14 गेटमधून सरासरी 100 दलघमी एवढे पाणी या प्रकल्पातून पेंच नदीत सोडण्यात आले आहे.

तोतलाडोह पेंच जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प असून मागील पाच वर्षांपासून अनियमित पावसामुळे या प्रकल्पामध्ये जलसाठ्यात कायम तूट निर्माण झाली होती. मध्यप्रदेश शासनाने मागील वर्षी पेंच डायव्हरशन हा चौराई येथे प्रकल्प बांधल्यामुळे या प्रकल्पात येणारा प्रवाह खंडित झाला. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे चौराई प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे तब्बल पाच ते सहा वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्या तोतलाडोह प्रकल्पात 10 ते 16.876 दलघमी एवढा जलसाठा निर्माण झाला आहे. त्यासोबत 34.900 दलघमी एवढी पाण्याची आवक सातत्याने सुरु आहे.

तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला 170 दलघमी पाणी आरक्षित असून पेंच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची सुमारे 1 लक्ष 4 हजार हेक्टर क्षेत्रासाठी 700 दलघमी तसेच कोराडी व खापरखेडा या थर्मलपॉवर स्टेशनसाठी 60 दलघमी पाणी आरक्षित असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे यांनी दिली. मागील वर्षी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडला होता. तसेच चौराई प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकल्पात असलेल्या 150 दलघमी मृतसाठ्यातून 90 दलघमी पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आला होता. त्यामुळे जलविद्युत निर्मिती सुद्धा थांबविण्यात आली होती.

मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे चौराई तसेच तोतलाडोह प्रकल्प सुद्धा पूर्ण क्षमतेने भरला असून 16 ऑगस्टपासून सरासरी 100 दलघमी पाणी पेंच नदीत सोडण्यात आले आहे. तसेच पेंच प्रकल्प सुद्धा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी पाणी देणे सुलभ होणार आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था
मध्यप्रदेश शासनाने चौराई येथे 577 दलघमी एवढ्या क्षमतेच्या प्रकल्पाची निर्मिती केल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील सिंचनावर विपरित परिणाम होवू नये. तसेच शहराला पिण्याचे पाणी कायम उपलब्ध व्हावे, यासाठी 468 कोटी रुपये खर्चाच्या सात उपसा सिंचन योजनांना शासनाने मान्यता दिली आहे. या उपाययोजना येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. त्यामध्ये चार योजना कन्हान नदीवर असून यामध्ये बीड चितघाट, सिव्होरा, माथणी (मौदा), बाबदेव या उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. यामध्ये निर्माण होणारे पाणी पेंच प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये सोडण्यात येणार आहे.

तातडीच्या उपाययोजनेंतर्गत कन्हान नदी सोबतच सूर नदीवरील काटी खमारी, बोरगांव नाला प्रकल्पावर हिंगणा उपसा सिंचन योजना तसेच चिंचोली उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवताना कन्हान नदीतील पाणी शेतकऱ्यांना खरीपसाठी वापरण्याला प्राधान्य राहणार आहे. या प्रकल्पातून सरासरी 120 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे.

आंतरराज्य पाणी वाटप लवादानुसार मध्यप्रदेश शासनासोबत 10 टीएमसी पाणी राज्याला उपलब्ध होणार असून यासाठी लोहभोगरी (छिंदवाडा) येथून कन्हान नदीवर बॅरेज बांधून 62 किलोमीटर लांबीच्या टनेलमधून तोतलाडोह प्रकल्पात गुरुत्वाकर्षणद्वारे आणण्याच्या प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेमुळे नागपूर शहराला पिण्याचे पाणी पुरविणे सुलभ होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पिण्याच्या पाण्यासाठी तयार करण्यात येणार असून जमिनीखालून टनेलद्वारे पाणी आणण्याचे नियोजित असून पर्यावरणाचाही कुठेही ऱ्हास होणार नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे यांनी दिली.

तोतलाडोह प्रकल्पाच्या जल व पूर व्यवस्थापानाच्या नियोजनासाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून जल संपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश धोटे व सहाय्यक अभियंता जयंत काठवटे हे प्रकल्पाच्या जलसाठ्याचे नियंत्रण करीत आहेत.