नागपूर -वाढदिवसाच्या आनंदावर एका गोळीने विरजण घातले आहे. मानेवाडा परिसरात सुरू असलेल्या पार्टीदरम्यान रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी सुटली आणि ती थेट १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात लागली. दारूच्या नशेत शस्त्राचा धाक दाखवण्याच्या प्रयत्नातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी मुलाला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात डीजे संचालक शैलेश गुल्हाने याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
नागपूरच्या मानेवाडा परिसरातील महल्ले सभागृहाजवळ ही धक्कादायक घटना घडली. वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान काही तरुणांनी मद्यपान केले होते. यावेळी ३५ वर्षीय शैलेश हिरामण गुल्हाने आणि १७ वर्षीय अर्जुन सुनील लाडसे यांच्यासह काही तरुण उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश हा डीजे संचालक असून अर्जुन त्याच्याकडे काम करण्यासोबतच अकराव्या वर्गात शिक्षण घेत आहे. याचदरम्यान अर्जुनने वर्गातील काही तरुण आपल्याला त्रास देत असल्याचे शैलेशला सांगितले. त्यावर शैलेशने काळजी करू नकोस, माझ्याकडे शस्त्र असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.
यानंतर शैलेश घरात गेला आणि रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आला. मद्यधुंद अवस्थेत त्याने सुरुवातीला हवेत गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता गोळी सुटली नाही. पुढे त्याने रिव्हॉल्व्हरची मॅगझीन काढून अर्जुनच्या दिशेने शस्त्र रोखले. मात्र, याचवेळी ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट अर्जुनच्या डोक्यात घुसली.
गोळी लागताच अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पार्टीत एकच गोंधळ उडाला. उपस्थित तरुणांनी तातडीने अर्जुनला एम्स रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रिव्हॉल्व्हरमध्ये आधीपासूनच काडतूस असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, शस्त्राची तांत्रिक स्थिती आणि नेमकी गोळी कशी सुटली, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ आणि हुडकेश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. शैलेश गुल्हानेसह घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांचीही चौकशी सुरू आहे.
एका वाढदिवसाच्या पार्टीत दारूच्या नशेत शस्त्राचा धाक दाखवण्याचा प्रयत्न एका १७ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. अखेर पार्टीत रिव्हॉल्व्हर कोणी आणली? ती कोणाच्या मालकीची होती? आणि गोळी नेमकी कशी सुटली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत.




