Published On : Tue, Aug 20th, 2019

कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल विकास आराखडा

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी घेतला सकारात्मक निर्णय पालकमंत्र्यांनी केले प्रयत्न

कामठी :-कामठी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ड्रॅगन पॅलेस टेंपल हे बौध्द पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या 40 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट पार्क, पर्यटन सुविधा, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने 214 कोटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली होती. यापैकी कामाचा टप्पा-1 ला 75 कोटी 16 लक्ष रुपयांच्या निधीला आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सर्वसाधारण योजनेतून हा निधी मंजूर करण्यात येणार आहे.

या प्रस्तावातील सर्व कामे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या विषयाला मंजुरी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. ड्रॅगन पॅलेस टेंपलची निर्मिती 1999 मध्ये जपानच्या बौध्द महाउपासिका श्रीमती नोरिको ओगावा आणि अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रयत्नांनी झाली. हे पॅलेस आंतरराष्ट्रीय शांती, मैत्री आणि मानव कल्याणकारी केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी 10 लाख पर्यटक आणि बौध्द उपासक या ठिकाणी भेट देत असतात.

अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनात टेंपलच्या परिसरात अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. या परिसरात विपश्यना मेडिटेशन सेंटरची भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. तळमजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तैलचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. याशिवाय दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राच्या भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रक़ल्पाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्थसाह्य प्राप्त झाले आहे.

ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या 214 कोटींच्या विकास आराखड्याला जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीने 2015 मध्ये मान्यता देऊन शासनाकडे हा आराखडा सादर केला होता. ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करणे, या परिसराचे सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत, अ‍ॅम्युजमेंट पार्क, वीज जोडण्या, पाणीपुरवठा, विपश्यना ध्यान केंद्राचे बांधकाम, डॉ. आंबेडकर बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतीगृह, विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या कामास पुरवणी मागणीद्वारे निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असून उच्चाधिकार समितीच्या 27.7.2019 बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार ऑकोमोडेशन व इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आवश्यक ती कामे पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यासाठी 75 कोटी 16 लक्ष इतका निधी सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर 30 कोटी 42 लाख, ऑकोमोडेशन 44 कोटी 74 उपलब्ध करून दिले जातील. यात बाह्य विद्युतीकरण, एक्सर्टनल प्लंबिंग, सॅनिटेशन, अग्निप्रतिरोध यंत्रणा, वास्तुविशारद शुल्क आदींचा समावेश आहे.

संदीप कांबळे कामठी