Published On : Mon, May 10th, 2021

नागपूर विभागात ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत ड्रॅगन फ्रूट आणि केशोरी मिरची !

Advertisement

नागपूर : खरीप पिकाचे नियोजन करताना ‘विकेल ते पिकेल’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम नागपूर विभागात राबविण्यात येणार आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार ड्रॅगन फ्रूट तसेच गोंदिया जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण अशा केशोरी मिरचीला प्राधान्य देण्यात आले आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या खरीप आढावा बैठकीत तृण धान्य, गळीत धान्य, भाजीपाला, फळपिके व मसाला पिकासारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनाला नागपूर विभागात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विकेल ते पिकेल याअंतर्गत शेती उत्पादनाला प्राधान्यक्रम दिला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावात गर्द लाल रंगाची व मध्यम तिखट असलेल्या मिरचीची लागवड करण्यात येते. सध्या देवरी, मोरगाव अर्जुनी या दोन तालुक्यात 200 हेक्टर केशोरी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत लागवड करण्यात येत असलेल्या हे मिरचीचे वाण मार्चपर्यंत राहते. इतर मिरची पिकापेक्षा जास्त एकरी पाच ते सहा क्विंटल वाळवल्या मिरचीचे उत्पादन होते. या पिकावर किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असून कमी फवारणीत चांगले पीक येत असल्यामुळे स्थानिक भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या मिरचीचे उत्पादन गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात वाढवून ते सरासरी 400 हेक्टरपर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ड्रॅगन फ्रूट या फळाची लागवड गोंदिया, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात करण्याचे नियोजित आहे. खरीप हंगामामध्ये सरासरी 20.5 हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीचा प्रती एकरी खर्च 3 लाख 13 हजार रुपये असून सरासरी उत्पादन 7 मेट्रीक टन प्रती एकर आहे. या फळाला सरासरी 75 रुपये प्रती किलोप्रमाणे दर अपेक्षित असून एकरी 5 लाख 25 हजार रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. नागपूर, रायपूर, जबलपूर येथे या फळाच्या विक्रीसाठी मार्केट उपलब्ध आहे.

‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत नाविण्यापूर्ण तथा बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांना खरीप हंगामामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर विभागात 4 हजार 233 हेक्टरमध्ये रब्बी ज्वारी, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात 120 हेक्टरमध्ये लाल भात, 163 हेक्टरमध्ये काळा भात, 1 हजा 860 हेक्टर करडई, 1 हजार 547 हेक्टर जवस, 2 हजार 404 हेक्टरमध्ये तीळ तर 3 हजार 95 हेक्टर भूईमूग या पिकाचे नियोजन आहे.

भाजीपाला पिकामध्ये करटोली व विदेशी भाजीपाला, सुगंधी वनस्पतीमध्ये सिंट्रोनेला तसेच मसाला पिकांमध्ये भिवापुरी मिरची, केशोरी मिरची, हळद व वायगाव हळद या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

कोविड काळात 6 हजार 805 क्विंटल विक्री
कोविड काळात शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी उत्पादक गट, शेतकरी गट तसेच आत्माअंतर्गत शेतमालाच्या विक्रीची नागपूर विभागात व्यवस्था करण्यात आली होती. विभागातील 550 शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून 372 विविध ठिकाणावरुन विक्री व्यवस्था सुरू करण्यात आली होती. या गटाच्या माध्यमातून ऑनलाईन तसेच थेट नोंदणीच्या माध्यमातून 6 हजार 805 क्विंटल इतकी विविध कृषी उत्पादनांची विक्री करण्यात आली.

कोविड काळातील शेतमाल विक्रीमध्ये नागपूर जिल्ह्यात 3 हजार 713 क्विंटल, गोंदिया जिल्हयात 1008 क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यात 720 क्विंटल, वर्धा जिल्ह्यात 689 क्विंटल, भंडारा जिल्ह्यात 135 तर गडचिरोली जिल्ह्यात 540 क्विंटल विविध कृषी उत्पादने थेट ग्राहकांना या प्रकल्पाअंतर्गत विक्री करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement