
नागपूर, ता. 26: नागपूर महानगरपालिकेचे नवे श्रीमंत राजे रघुजीनगर भवनाचे (टाऊन हॉल) अंतिम टप्प्यात आले असून, उद्घाटनानंतर या इमारतीची सुरक्षितता, देखरेख, डागडुजी व सभागृहाच्या कामकाजाबद्दल प्रशासनाने दुसऱ्या महानगरपालिकांचा अभ्यास करून विधि विभागाच्या सहकार्याने एक नियमावली तयार करावी, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नव्या टाऊन हॉलचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात करण्याचे निश्चित झाले असून या नव्या वास्तूंमध्ये नेमक्या काय सोई सुविधा राहणार आहेत तसेच या इमारतीच्या सुरक्षित, देखरेख कशी राखायची, या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 26) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेता श्री. संजय महाकाळकर, इंडियन मुस्लिम लिगचे गटनेता श्री. असलम मुल्ला खान, नगरसेवक श्री. बंडू राऊत, नगरसेवक श्री. सचिन नाईक, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मरुगानंथम एम, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरूबक्षानी, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाने, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांच्यासह विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर बांधकाम – नरेंद्र (बाल्या) बोरकर
नागपूर महानगरपालिकेचे नवे सभागृह हे सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर बांधण्यात आलेले आहे. देशातील इतर महानगरपालिकेच्या असलेल्या सभागृहापेक्षा हे सभागृह वेगळे राहणार आहे. यामुळे या इमारतीची देखरेख राखणे, डागडुजी करणे, या इमारतीमध्ये नगरसेवक व इतरांच्या प्रवेशाबद्दल निश्चित नियमावली तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सत्ता पक्षनेता श्री. बोरकर यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला काही लेखी सूचना केल्या. या सूचनांवर प्रशासनाने आपले मत व्यक्त करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पेपरलेस कामकाज
यावेळी सभागृहाचे कामकाजाबद्दल अधिकार्यांकडून माहिती देण्यात आली. सभागृहाचे कामकाज पेपरलेस करण्यात येणार आहे. नगरसेवकांना डीजीटल प्रणाली हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नगरसेवकांचे होणारे भाषणाची क्लिप कार्यालयातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सुरक्षिततेला महत्त्व
या इमारतीची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी एक्सेस कंट्रोल तसेच आरएफआयडी टॅग या डीजीटल पद्धतीचा वापर केला जाणार आहे. इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी नगरसेवकांना यासाठी आयडी कार्ड दिले जाईल तसेच फेस व थम्ब रिकिग्निशनने नगरसेवकांना सभागृहात जाता येईल.



