Published On : Tue, Sep 22nd, 2020

डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने महान विचारवंताला मुकलो – डॉ. नितीन राऊत

Advertisement

नागपूर: सुप्रसिद्ध साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ व साहित्य जगात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अचानक निर्वाण, मनाला चटका लावून गेले आहे, अश्या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपली शोक संवेदना व्यक्त केली आहे.

सामाजिक व राजकीय जीवनात काम करीत असतांना भाऊंची अनेक विद्वत्तापूर्ण व्याख्याने ऐकण्याची संधी लाभली. त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धर्मावरील विद्वत्ता वाखाणण्याजोगी होती. नागपूर विद्यापीठातील त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांची व शिक्षक वर्गाची खूप गर्दी असायची कारण आपल्या प्रत्येक व्याख्यानात भाऊ बौद्ध धम्मा विषयी नाविन्यपूर्ण गोष्टी विषद करीत असे. त्यांच्या विद्यापीठाच्या बाहेरील व्याख्यानाला सुद्धा लोकांची गर्दी असायची. एकंदरीत नागपूरचे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विश्व भाऊंनी समृद्ध केले.

पाली विषयात संशोधन व लिखाण करीत असतांना त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत हिरीरीने सहभाग घेतला. भाऊ लोखंडे हे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. त्यांच्या दुःखद निधनाने एका अभ्यासू विचारवंताला देश मुकला आणि समाजाची अपिरिमित हानी झाल्याची खंत डॉ.राऊत यांनी व्यक्त केली.