Published On : Fri, Jun 30th, 2017

डॉ. सोनवणे व्यापक दृष्टीकोन असलेले अधिकारी : आयुक्त मुदगल


नागपूर:
स्पष्टवक्ता आणि कायद्याचे ज्ञान असलेला अधिकारी म्हणून नावलौकीक असलेले नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे शासकीय सेवेतून शुक्रवार ३० जून रोजी निवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा आणि सेवेचा गौरव म्हणून मनपात आयोजित तीन विविध कार्यक्रमात त्यांना निरोप देत त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सेवानिवृत्तीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या परंपरेप्रमाणे मनपातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात त्यांचा मनपाचा लोगो आणि नाव चिन्हांकीत असलेला दुपट्टा, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, निगम सचिव हरिश दुबे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, स्वच्छ भारत मिशनमधील सल्लागार डॉ. अशोक उरकुडे आणि सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करीत पुढील जबाबदारी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. सोनवणेंचा दृष्टीकोन व्यापक : आयुक्त मुदगल
आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अधिकाऱ्यांतर्फे अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी आयुक्त अश्विन मुदगल होते. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. रिजवान सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, सहायक संचालक (नगररचना) सुप्रिया थूल, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त राजेश कराडे, महेश मोरोणे, सुवर्णा दखणे, प्रकाश वराडे, जी. एम. राठोड, आर.पी. भिवगडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, आव्हानांना समर्थपणे पेलण्याचे सामर्थ्य आणि शक्ती डॉ. रामनाथ सोनवणे यांच्यात आहे. नागरी सेवा संस्थांमध्ये काम करताना व्यापक दृष्टीकोन असावा लागतो. असा व्यापक दृष्टीकोन आणि अभ्यासू वृत्ती श्री. सोनवणे यांच्यामध्ये असल्यानेच त्यांच्यावर आता स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी नवी जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ यापुढेही येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळत राहणार आहे. अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी यावेळी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळाची माहिती सांगताना त्यांच्यातील उत्तम प्रशासकाचा गौरवोल्लेख केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. रामनाथ सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकाळातील खाचखळगे सांगितले. अनेक कठोर निर्णय घेतल्याचा उल्लेख करीत यामुळे अनेक चौकशांना सामोरे जावे लागले. मात्र माझे निर्णय योग्य आणि अचूक असल्यानेच तावून-सुलाखून बाहेर पडलो. ३४ वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त होताना समाधान असल्याचे उद्‌गार त्यांनी काढले. संचालन सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.

सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार
सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारीवृदांतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त रवींद्र देवतळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, निगम अधीक्षक राजू काळे आदी उपस्थित होते. कर्मचारीवृंदातर्फे यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन डॉ. सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम प्रशासक, रोल मॉडेल, महानगरपालिकेत सर्वाधिक सेवा देणारे एकमेव अधिकारी, स्पष्टवक्ता, कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेणारा अधिकारी या शब्दात मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. आपल्यासारखे चांगली माणसे भेटत गेली त्यामुळे माझा कार्यकाळ उत्तम राहिला. आपणा सर्वांचा मी ऋणी असल्याचे भावोद्‌गार अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. कार्यक्रमाचे संचालन किशोर तिडके यांनी केले. आभार डोमाजी भडंग यांनी मानले.