Published On : Tue, May 19th, 2020

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी श्रमिक रेल्वेचे नियोजन – डॉ. संजिव कुमार

• ईच्छूक नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करा
• बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंडसाठी श्रमिक रेल्वे

नागपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजिव कुमार यांनी केले आहे.

विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यासाठीचे नियोजन करताना यापुढे संबंधित राज्याच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. तसेच श्रमिक रेल्वेचा संपूर्ण खर्च केंद्र शासनाच्या वतीने रेल्वेला अदा करण्यात येणार आहे.

प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असून यासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आपली संपूर्ण माहिती देण्यात यावी. यामध्ये दूरध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) आवश्यक आहे. आपल्या जाण्याच्या प्रवासानुसार संबंधित श्रमिक रेल्वे संबंधी संपूर्ण माहिती आपणास मोबाईलवर अथवा दूरध्वनीवर कळविण्यात येईल. यामध्ये रेल्वेची जाण्याची दिनांक, वेळ आदी संपूर्ण माहिती कळविण्यात येईल.

तरी श्रमिक रल्वेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजिव कुमार यांनी केले आहे.