Published On : Sat, Apr 14th, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक देशाचा मानबिंदू ठरेल : प्रधानमंत्री

नवी दिल्ली: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 26 अलीपूर स्थित राष्ट्रीय स्मारक देशाचा मानबिंदू ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले.

26 अलीपूर स्थित डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला, त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. उद्घाटनानंतर हे स्मारक राष्ट्राला समर्पित करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.हर्षवर्धन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विजय सांपला, केंद्रीय सामाजिक न्याय सचिव जी.लता यावेळी मंचावर उपस्थित होते. यासह या उद्घाटन सोहळ्यास विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली असल्याचे प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. बाबासाहेबांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान भारताला मिळाले असल्याचे सांगून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या स्मारकाला पुस्तकाच्या स्वरूपात उभारण्यात आलेले आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आचार विचारांचे प्रतिक असल्याचे श्री मोदी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन अस्पृश्य, शोषित, पीडित, वंचितांना न्याय, बंधुता आणि समानता देण्यासाठी संघर्षीत राहिले. त्यांचे जीवन हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवनचरित्र या स्मारकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पाहोचेल, असे श्री मोदी म्हणाले.

बाबासाहेबांची कर्तव्य निष्ठा, सत्य निष्ठा, देशप्रेम प्रत्येक भारतीय सदोदीत आठवणीत ठेवेल. या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे जीवन जागतिक स्तरापर्यंत पोहोचेल, असेही श्री मोदी यावेळी म्हणाले. भारत सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जनतेच्या जीवनमानात होणाऱ्या सकारात्मक बदलांची माहिती श्री मोदी यांनी यावेळी दिली.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 नोव्हेंबर 1951 ला केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. त्यानंतर ते दिल्लीतील 26, अलीपूर रोड येथील सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहू लागले. पुढे 6 डिसेंबर 1956 रोजी याच ठिकाणी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. डॉ. आंबेडकरांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी 2 डिसेंबर 2003 रोजी ही वास्तू राष्ट्राला समर्पित केली.

डॉ. आंबेडकर स्मारकाची वैशिष्ट्ये
भारतीय संविधान निर्माते ही ओळख जनतेपर्यंत पोचविण्यासाठी स्मारकास पुस्तकाचा आकार देण्यात आला आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांची 12 फुटांची कास्य प्रतिमा, डिजीटल प्रदर्शनी, तथागत गौतम बुद्धांची ध्यानस्थ प्रतिमा आहे. या स्मारकाच्या ठिकाणी ध्यान केंद्र, बोधी वृक्ष आणि संगीतमय कारंजे ही आहेत.

एकूण 7374 चौ.मीटर उंचीचे हे स्मारक एकूण 6758 चौ. मीटर क्षेत्रावर उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या प्रवेश द्वारावर 11 मिटर उंचीचे अशोक स्तंभ आणि याच्या मागे ध्यान केंद्र आहे. या सोबत पावसाच्या पाण्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली जलसिंचन व्यवस्था, सौर उर्जेचे सयंत्र बसविण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement