Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Sep 17th, 2017

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रनिर्माणाचा समग्र दृष्टिकोन भविष्यातील पीढीकरीता मार्गदर्शक‌ : नितीन गडकरी

  ·‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडीया’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन श्री. नितीन गडकरी यांचे हस्ते संपन्न
  ·राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्तचा उपक्रम


  नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनातून राष्ट्रनिर्माणासाठी प्रकट झालेले विचार समाजापुढे येणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचा राष्ट्रनिर्माणाचा दृष्टिकोन हा केवळ संविधान निर्मितीपुरता मर्यादित नसून त्यामध्ये आर्थिक , उद्योगिक, विकास, जलवाहतूक, नदिजोड प्रकल्प, अशा विविध विषयांच्या व्यासंगामुळे समग्र अशा प्रकारचा होता.

  “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडीया” या गौरवग्रंथाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दृष्टिकोन व विचार भविष्यातील पीढीकरीता मार्गदर्शक ठरेल , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री श्री.नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडीया’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रशासकीय परिसरात झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्‌धीविनायक काणे, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, प्र-कुलकुरु डॉ. प्रमोद येवले, योजना आयोगाचे माजी सदस्य व गौरवग्रंथाचे अतिथी संपादक डॉ. भालचंद्र मुणगेकर , ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, गौरवग्रंथाचे संपादक डॉ. मधुकर कासारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

  डॉ. आंबेडकरांनी केंद्रीय मंत्री असतांना जलवाहतूक व नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. ती जर त्याकाळीच अंमलात आली असती तर देशाचा विकास दर ३ टक्क्याने वाढला असता. ‘इंनलॅंड वाटरवेजची’ प्रेरणा बाबासाहेंबाच्या जलवाहतूकीसंदर्भातील विचारातून मिळाली असून आपण देशातील १११ नद्यांमध्ये जलमार्गवाहतूकीसाठी प्रयत्नशील आहोत, असे मत श्री. गडकरी यांनी यावेळी मांडले.


  कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेतल्या जाणा-या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये आंतर-राष्ट्रीय बौद्‌ध अध्ययन केंद्र, संविधान पार्क, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसोर्स अ‍ॅंड क्नॉलेज सेंटर तसेच “डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडीया” या गौरवग्रंथाचे प्रकाशन या उपक्रमांचा समावेश आहे.

  बाबासाहेबांनी परराष्ट्र धोरण, संरक्षण,राष्ट्रीय सुरक्षा, करप्रणाली अशा विविध विषयांची हाताळणी केली असल्याने त्यासंदर्भातील त्यांचे विचार आजही कालसंगत आहे. ते विचार धोरणनिर्मिती करणा-या राज्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणावेत, असे आवाहन गौरवग्रंथाचे संपादक डॉ. मधुकर कासारे यांनी याप्रसंगी केले. डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विचार व संशोधनातूनच वित्त आयोग , रिझर्व बँक ऑफ इंडीया यांची संकल्पना मांडली गेली, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

  गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मुळ ५०० रुपये किंमत असलेल्या या ग्रंथाची विक्री सवलतीच्या दरात ४०० रु.ने करण्यात आली .या कार्यक्रमास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145