नागपूर. धंतोली येथील यशवंत स्टेडियमच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक व संशोधन केंद्राचा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या जागेवर स्मारक तयार करण्यासंदर्भात जागेचे लीज नूतनीकरण करण्याबाबत आवश्यक ते प्रयत्न करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. या विषयाच्या संदर्भात बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता.
सन १९७७ पासून सदर विषय प्रलंबित असून यासंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री सर्वश्री अशोकराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस या सर्वांकडे जागेची लीज वाढवून देण्याबाबत वेळोवेळी मागणी करण्यात आली. विद्यमान उर्जामंत्री डॉ.नितीन राउत यांनाही निवेदन देण्यात आले असल्याची माहिती जितेंद्र घोडेस्वार यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब जन्मशताब्दी स्मारकाकरिता अद्यापही शासनाकडून अधिकृत जागा मिळालेली नाही. १९७७ पासून प्रशासनाद्वारे लीज नूतनीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. सदर कामाचे महत्व लक्षात घेउन आर्कीटेक्टकडून स्मारकाचे संकल्पचित्र तयार करून ते शासनाकडे सादर करणार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे नेते आहेत. देशासाठी त्यांचे योगदान लक्षात घेता स्मारक हे वैश्विक स्वरूपाचे असावे. यासाठी वैश्विक स्वरूपात डिझाईन तयार करण्यासाठी स्पर्धा घेण्यात यावी. स्मारकासंदर्भात सर्व पक्षीय नगरसेवकांच्या संकल्पना अंतर्भूत करण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांचा समावेश असलेली एक समिती गठीत करण्यात यावी. तसेच लीज नूतनीकरणासाठी प्रशासकीय स्तरावरून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.