– जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचे आश्वासन
– उत्तर नागपूर काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नागपुर – राज्यातील शिंदे-फडणवीस (ईडी) सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकार राज्यातील मोठ-मोठे प्रकल्प पळवून इतरत्र स्थापित करीत आहेत. त्यापाठोपाठ आता गोरगरीब जनतेला उत्तम आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या उत्तर नागपुरातील प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाने असलेले व उभे होणारे देशातील पहिले पोस्ट गॅज्येएट इंस्टीटयुट ऑफ मेडीकल सायन्स कॉलेज इतरत्र पळविण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारच्या या षडयंत्राचा उत्तर नागपूर कॉग्रेस कमिटीतर्फे तीव्र निषेध नोंदविला आहे. यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. इटनकर यांनी डॉ. आंबेडकर रुग्णालय इतरत्र जाऊ देणार नाही, शाळेच्या जागेबाबत न्यायालयाचाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मात्र पुढील आठ दिवसात यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय उत्तर नागपूर व ग्रामीण भागातील कामठी, रामटेक, नागपूर ग्रामीण, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णाकरिता फारच सोईचे आहे. शासकीय इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (मेयो) व मेडीकल रुग्णालयात उपचार घेण्याकरीता मध्यप्रदेश व छत्तीसगड सारख्या शहरातून येणे आर्थिक दृष्टया असूविधेचे असून रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. राज्यात स्वास्थ्य विभागात डॉक्टरांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनेतच्या स्वास्थ्याशी खेळ सुरु आहे.
उत्तर नागपुरातील मागासवर्गीय, ग्रामीण भागातील गोर गरीब जनता, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील रुग्णांना आरोग्य विषयक सोई-सुविधा मिळावी या करिता डॉ. आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रास शासनाने शासन निर्णय क्र. सी.ओ.एन.-3496/प्र.क्र.5/97/ प्रशासन-1, मंत्रालय मुंबई दिनांक 17 मार्च 1999 रोजी 250 खाटांचे रुग्णालय व बाहयरुग्ण इमारतीच्या बांधकाम व रुग्णालयास प्रशासकीय मान्यता देवून 8 कोटी 7 लाख 25 रुपयाची मजुरी दिली. याचा पायाभरणी समारंभ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला तर बाहय विभागाचे बांधकाम करुन त्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
तद्नंतर महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र याचे श्रेणीवर्धन करुन शासन निर्णय क्र. एम.इ.डी/1012/प्र.क्र 251/ शिक्षण-2 दि. 04-03-2014 रोजी 568 खाटांचे अद्ययावत रुग्णालय करण्यासाठी व पदनिर्मितीस तत्वता मान्यता देण्यात आली आणि रु. 209 कोटी निधी मंजूर करण्यात आला. सदर रुग्णालयाच्या कामाला विलंब होत असल्यामुळे मा. उच्च न्यायालयात जनहित याचीका (PIL) 2016 ला दाखल करण्यात आली व त्याचा निर्णय 31 जानेवारी 2018 ला लागून मुंबई उच्च न्यायलय नागपूर खंडपीठाने 4 महिन्यात मंजूर प्रस्तावानुसार रुग्णालयाचा विस्तार करण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला. परंतु बाजप प्रणित राज्य शासनाने सदर निर्णयानुसार कार्यवाही न करता विलंब लावला. हा प्रकार मा. उच्च न्यायालयाचा अवमान करणे होय.
तद्दनंतर महाराष्ट्र शासन वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय क्रमांक न्यायाप्र. 2018/प्र.क्र. 174/ प्रशा-1 दि. 13 ऑक्टोबर 2021 नुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखाली इंदिरा गांधी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय संस्थेशी संलग्नित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय व अनुसंधान केंद्र नागपूर या संस्थेचे श्रेणीवर्धन करुन तेथे 17 पदव्युत्तर, 11 अतिविशेषोपचार अभ्यासक्रम, रुग्णालयीन प्रशासन / व्यवस्थापन विभाग व दंत बाह्यरुग्ण विभाग तसेच अभ्यासक्रमांशी संबंधीत 615 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास तसेच सदर संस्थेचे नामाभिधान “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिविशेषोपचार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था” असे करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे सदर प्रकल्पाचा अनावर्ती खर्च सुमारे रु. 989.03 कोटी व प्रथम तीन वर्षाचा आवर्ती खर्च रु. 176.62 कोटी अशा एकूण रु. 1165.65 कोटी रुपयांच्या खर्चास तसेच सदर संस्थेसाठी प्रतिवर्षी येणाऱ्या रु. 78.80 कोटी आवर्ती खर्चास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
सदर रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन करीता 28628 चौ.मी. जागा उपलब्ध आहे. न्यु ग्रॅट एज्युकेशन सोसायटी व्दारे संचालित प्राथमिक शाळेची इमारत 1500 चौ.मी जागेवर असून शाळा सुरु नसुन ह्या शाळेची शासनाने मान्यता सुध्दा रद्द केली आहे. तसेच क्रिकेट ॲकॅडमीव्दारे क्रिकेट प्रॅक्टीसकरिता नेट व चौकीदाराला राहण्याकरिता अतिक्रमण केलेली जागा मिळविण्याकरिता प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या कारणामुळे डॉ. आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र हलविण्याचा घाट आखला जातात आहे. गोर गरीब, मागासवर्ग, आदिवासी जनतेच्या आरोग्य विषयक सोईसाठी मंजुर असलेले सदर श्रेणीवर्धन रुग्णालय इतरत्र हलविणे म्हणजे जनतेचा आरोग्याशी खेळ सुरू आहे.
मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंधन व मा. उच्च न्यायालयाची अवमानना देखिल आहे. स्थानिक लोक प्रतिनिधी डॉ. नितीन राऊत यांच्या अथक प्रयत्नाने 2014 साली उत्तर नागपुरात इंजिनीयरिंग कॉलेज आणले होते. ते पळविण्यात आले व आता डॉ. आंबेडकर हॉस्पिटल सुध्दा पळविण्याचा घाट घातला जात आहे. सदर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन त्वरित पूर्ण करण्यात यावे तसेच हे रुग्णालय इतरत्र हलवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर श्रेणीवर्धन रुग्णालय, इतरत्र स्थालांतरीत केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी शिष्टमंडळात सर्वश्री बंडोपंत टेम्भूर्णे, ठाकुर जग्यासी, हरिभाऊ किरपाने, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, मुलचंद मेहर, जॉन जोसेफ, जॉन बेग, दिनेश यादव, परसराम मानवटकर, नेहा निकोसे, कल्पना द्रोणकर, बेबी गौरीकर, विजया हजारे, गीता श्रीवास, सतीश पाली, आसिफ शेख, निलेश खोब्रागडे, चेतन तरारे, महेन्द्र बोरकर, रेखा लांजेवार, प्रकाश नांदगावे, इंद्रपाल वाघमारे, शारदा रामटेके, ज्योती गोलाईत आदी उपस्थित होते.