Published On : Thu, Oct 10th, 2019

माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांच्या पराभवासाठी- डॉ. आशिष देशमुख

शेकडो कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये, माकपचा पाठींबा

नागपूर- लोकविरोधी प्रवृत्तीचे प्रतीक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करण्यासाठीच मी या निवडणुकीत लढत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी केले. खामला येथील प्रचार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“देशापुढील आणि महाराष्ट्रापुढील अत्यंत आव्हानात्मक अशा स्थितीत राज्याच्या विधानसभेची ही निवडणूक होते आहे. या देशाची आर्थिक घडी विस्कटून टाकणाऱ्या, या देशातील शांतता आणि सौहार्द संपवणाऱ्या, बलाकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या, जीएसटी, नोटाबंदी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे, कमी होत असलेली जीडीपी, महागाई अशा अनेक विषयांना कारण ठरणारी धोरणे आखणाऱ्या आणि मस्तवालपणे मतदारांना गृहित धरून राज्य चालवू पाहणाऱ्या भाजपचे प्रतीक म्हणून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करण्यासाठी मी उभा आहे, असेही ते म्हणाले.

ही लढाई माझी एकट्याची नाही. ही वास्तवात सर्व समाजाची लढाई आहे. तुमच्या कुटुंबाची लढाई आहे. भाजपने देशाचा किंवा महाराष्ट्राचा विकास केल्याच्या बाता सांगितल्या जातात. वास्तवात त्यांनी फक्त ठेकेदारांची आणि स्वतःची घरे भरली. फक्त रस्ते बांधल्याने समाजाचा विकास होत नाही. भाजप सत्तेत आल्यानंतर तुमच्या-माझ्या जीवनात काय फरक झाला ? आपला मतदारसंघ सुजाण आहे. सुशिक्षित आहे. तुम्ही स्वतःच विचार करा…स्वतःला प्रश्न विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपच्या काळात त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे स्वस्ताई आली काय? आश्वासन दिल्याप्रमाणे रोजगार निर्माण झाला काय?

युवक-युवतींना आपल्या आई-वडिलांना एकटे सोडून नोकरीसाठी बाहेर जावे लागत नाही काय?

उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक झाली काय? नवे उद्योग आले काय? सबका साथ, सबका विकास झाला काय?

कालपर्यंत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे हिंदू-मुस्लिम-दलित आणि इतर सारे समुदाय एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत की नाही?

त्यांच्यात प्रसंगी शत्रुत्व निर्माण होते की नाही? त्यासाठी कोणाचे धोरण कारणीभूत ठरते?, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

आपल्या सामाजिक सौहार्दाला, सद्भावनेला, शांततेला भाजपच्या काळात तडा गेला आहे, असे सांगून ते म्हणाले की,
राज्यघटनेने वंचितांसाठी दिलेल्या सवलतींबद्दल सवर्ण समाजाचा गैरसमज करून देण्याची मोहीम चालवली जात आहे की नाही?

माहितीच्या अधिकारासारखे सामान्य जनतेला सशक्त करणारे हत्यार भाजपने निकामी केले की नाही?

बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर जगणारे ज्येष्ठ नागरिक आणि अन्य लोकांना बँकांमध्ये पैसा ठेवणे आता असुरक्षित वाटू लागले आहे की नाही?
केबल टीव्हीसारखी आपली मनोरंजनाची साधने किती स्वस्त होती. आता ती स्वस्त राहिली आहेत काय? भाजपने मनोरंजन स्वस्त करण्याचे आश्वासन दिले होते की नाही?

भाजपने विविध प्रकारच्या करांत कपात करण्याचे आश्वासन दिले होते की नाही? जीएसटी त्यासाठीच आणला होता ना? एकूण कराचा भार कमी झाला का? की वाढला?

असे प्रश्न असंख्य आहेत. ते आपण मतदार म्हणून स्वतःला आणि राज्यकर्त्यांनाही विचारले पाहिजे आणि विचारपूर्वक मतदान केले पाहिजे.
सर्वांनी एकजुटीने, संघटीत होऊन लढा देण्याची गरज असून ही निवडणूक जिंकणे कठीण नाही. विश्वासपूर्ण काम करा, आपला विजय नक्की आहे”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज खामला येथील कॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयात आयोजित शेकडो युवक-युवतींनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. बबनराव तायवाडे, श्री. प्रफुल्ल गुडधे पाटील, श्री. राकेश पन्नासे, श्री. मंगेश कापसे, श्री. अभिजित फाळके, श्री. मंगेश कामोने व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. आशिष देशमुख यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नागपूर जिल्हा कमेटीने एका पत्राद्वारे आपला पाठींबा घोषित केला आहे.

नागपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार श्री. खटी हे आज श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारात भाजपचा दुपट्टा घालून प्रचार करीत होते. त्यामुळे फडणविसांचे शासकीय दबावतंत्र पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या घटनेचा या सभेत निषेध करण्यात आला. कुलगुरूंनी यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

अभिवादन

दि. ०८.१०.२०१९ ला दीक्षाभूमी येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना केले अभिवादन-
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने डॉ. आशिष देशमुख दि. ८ ऑक्टोबरला दीक्षाभूमी येथे गेले. भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला अभिवादन करून त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. संलग्न- दीक्षाभूमी फोटो