Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर हादरले…काही तासांत दोन खून; एकीकडे पत्नीचा खून, तर भांडेवाडीत युवकाची हत्या!

Advertisement

नागपूर : उपराजधानी नागपुरात काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरले आहे. एका प्रकरणात पतीने पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, तर दुसऱ्या घटनेत भांडेवाडी परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या सलग घडलेल्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहिली घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडा शिरपूर रोड येथे उघडकीस आली. रस्त्याच्या कडेला एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा आढळल्या आहेत. प्राथमिक तपासात महिलेची अन्यत्र हत्या करून मृतदेह घटनास्थळी आणून टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात पतीनेच पत्नीची हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नसून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

दरम्यान, दुसरी घटना भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर येथे घडली. गणेश प्रितमलाल बोरकर या युवकाची अज्ञातांनी हत्या केली. स्थानिक पातळीवर तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची चर्चा असली, तरी हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

दोन्ही घटनांची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या या दोन हत्यांमुळे नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून, तपासानंतरच हत्यांमागील नेमके कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.