
नागपूर – राज्यातील हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून पुढील तीन तास महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट लागू करण्यात आला असून अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची सुरुवात झाली आहे.
एका बाजूला पावसाची शक्यता असताना दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांत उष्णतेचा तडाखा कायम आहे. वर्धा आणि अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाच्या सरींमुळे शेती पिकांवर परिणाम होत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हवामानातील या सततच्या बदलामुळे राज्यात दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर भागात पुढील काही तासांत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कालही नांदेड, हिंगोली, धाराशिव, सांगली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला होता. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.
मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला असून ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, गारपीट आणि मुसळधार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली येथे पावसाने हजेरी लावली असून संभाजीनगरमध्ये तापमानात घट झाल्याने वातावरणात बदल जाणवत आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. सकाळीच सत्र घेऊन जास्तीत जास्त ११ वाजेपर्यंत सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सांगितले असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.








