Published On : Sun, Nov 4th, 2018

दूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे होणार बंद, महाराष्ट्रातील ५५ केंद्रांचा समावेश

कोल्हापूर : डिजिटलच्या तुफानात दूरदर्शनचा काड्यांचा अ‍ॅँटेना इतिहासजमा होणार आहे. अ‍ॅनालॉग पद्धतीची देशभरातील सुमारे
१४०० प्रक्षेपण केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २७२ केंद्रे बंद करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात २१४ केंद्रे १७ नोव्हेंबरला बंद होतील. राज्यातील साता-यासह १२ केंद्रांचा त्यात समावेश आहे.

सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यातच अ‍ॅनालॉग पद्धतीच्या प्रक्षेपकाची (ट्रान्समीटर) आयुमर्यादा सुमारे १५ वर्षे असते. सध्याच्या काळात नवे ट्रान्समीटर तुलनेने खर्चिक आहेत. शिवाय उपग्रह (डीटीएच ) सेवा स्वस्त आहे. यामुळे १५ वर्षांहून अधिक काळ झालेले ट्रान्समीटर बंद करण्याचा निर्णय २०१५ मध्ये केंद्र सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी २०१८ मध्ये सुरू झाली. पहिल्या टप्प्यात २७२ लघुप्रक्षेपण केंद्रे बंद
करण्यात आली.

राज्यातील बंद झालेली व होणारी केंद्रे
पहिल्या टप्प्यात राज्यातील अकोट, अक्कलकोट, अंमळनेर, आर्वी, बार्शी, चांदूर, धर्माबाद, दिगलूर, इचलकरंजी, कराड,कारंजा (वाशिम), खानापूर, मालेगाव, मंगळवेढा, मनमाड , माणगाव, मेहेकर, नवापूर, पांढरकवडा, पाटण, फलटण, पुलगाव, रावेर, वणी, वर्धा, भंडारा (डीडी न्यूज), मालेगाव (डीडीन्यूज) ही केंद्रे बंद करण्यात आली आहेत. दुस-या टप्प्यात दर्यापूर, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, रिस्सोड, सातारा . याशिवाय डीडी न्यूजचे प्रक्षेपण सांगली. अकोला, धुळे व कोल्हापूर येथील डीडी न्यूजचे प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे.