Published On : Wed, Mar 18th, 2020

चिंता करु नका; आम्ही सारे तुमच्या सोबत आहोत!

Advertisement

कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबाला महापौर संदीप जोशी यांनी दिला धीर

नागपूर : ‘कोरोना’ला घाबरण्याचे कारण नाही. या विषाणूसोबत नागपूरकर नीडरपणे लढा देत आहे. आपणही घाबरु नका. चिंता करू नका. आम्ही सारे तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी ‘करोना’ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबीयांना दिला.

‘कोरोना’ विषाणूचा पहिला रुग्ण ठरलेल्या व्यक्तीच्या घरी महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता. १७) भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला. त्यांच्याशी चर्चा करून यापुढे आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन केले. कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे त्यांना आश्वस्त केले.

कोरोना व्हायरस हा संप्रेरक रोग असून तो पसरु नये म्हणून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी नागरिक घाबरत असल्याने आणि बऱ्याच ठिकाणी बेफिकीर होऊन वागत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. हे लक्षात घेत महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे भेट देऊन रुग्णांकरिता असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. दोन्ही ठिकाणी प्रशासनाद्वारे जी व्यवस्था करण्यात आली आहे त्याबद्दल जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. केवलिया आणि मेडिकलचे अधिष्ठातांचे मनापासून अभिनंदन केले. घाबरण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने बाधित असलेले रुग्ण गुन्हेगार नाहीत. कुणावरही ही वेळ येऊ शकते. त्यामुळे त्याची काळजी योग्यप्रकारे घ्यायला हवी. कोरोनाबाधित रुग्णाचा परिवार हा आपलाच परिवार असून रुग्णांचे नातेवाईक हे देखिल आपलेच नातेवाईक आहेत. त्यांना धीर द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नागपुरात जो कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यांच्यावर दुर्देवाने वाईट परिस्थिती ओढावली आहे. त्यांच्याकडे मोलकरीण नाही. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सामाजिक बहिष्कार टाकल्यासारखे वागत आहेत, हे अगदी अयोग्य आहे. अशा परिवाराला काळजी घेत भेटल्यास आपल्याला कोणताही अपाय होणार नाही. परिवाराला धीर देणे, त्या परिवाराच्या पाठिशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत महापौर या नात्याने आपण स्वत: या कुटुंबाला धीर देण्यासाठी आल्याची भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर, चिंता करु नका. संपूर्ण शहर आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांना दिला.