Published On : Thu, Jun 11th, 2020

घाबरू नका, काळजी घ्या, सहकार्य करा.

Advertisement

मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे नाईक तलाव व बांगलादेश परिसरातील नागरिकांना आवाहन

नागपूर : नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वत:सह इतरांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्गाने जर कोरोना झालाच तर त्याला घाबरून जायची गरज नाही. रुग्णालयामध्ये त्यावर यशस्वी उपचार केले जातात. कोरोनामधून बरे होणा-या रुग्णांची संख्या नागपूर शहरात मोठी आहे. त्यामुळे कुणीही आपल्यातील लक्षणे लपवू नये. प्रशासनातर्फे जर विलगीकरण कक्षात जाण्यास सांगण्यात येत असेल तर त्याला विरोध करू नका. विलगीकरण कक्षामध्ये उत्तम सेवा पुरविण्यात येत असून सुरक्षेसाठी तिथे राहणे अत्यावश्यक आहे. एकूणच कोव्हिडच्या संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे पालन करा, घाबरू नका, स्वत:सह इतरांचीही काळजी घ्या आणि मनपाला सहकार्य करा, असे आवाहन मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.

गुरूवारी (ता.११) मनपाच्या अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथकाने नाईक तलाव व बांगलादेश परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी माने, डॉ. वसुंधरा भोयर उपस्थित होते.

नाईक तलाव व बांगलादेश परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशा स्थितीत मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे तेथील नागरिकांना कोरोनाशी मुकाबला करण्याचे दृष्टीने धीर देण्यात आला. स्वत:मुळे इतर कुणीही बाधित होउ नये यासाठी स्वत:लाच काळजी घेणे आवश्यक आहे. नियमीत मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, हात धुणे या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे आढळल्यास त्वरीत मनपाच्या नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१ आणि ०७१२-२५५१८६६ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.