Published On : Sat, Apr 17th, 2021

ना.गडकरी आणि ना.फडणवीस यांच्यावर बोलण्याइतपत लोंढेंची यांची पात्रता आहे का?

भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा सवाल

नागपूर : शहरावर ओढवलेल्या कोरोनाच्या या संकटकाळात आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तळमळीने कार्य करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करण्याची काँग्रेसच्या अतुल लोंढे यांची पात्रता तरी आहे काय ? असा सवाल भाजपाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

कोरोना काळात केल्या जात असलेल्या कार्याची कुठलीही माहिती न घेता अतुल लोंढे यांच्या गलिच्छ राजकीय भावनेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या वक्तव्याला प्रत्यूत्तर देताना ॲड. धर्मपाल मेश्राम बोलत होते.

ते म्हणाले, स्वातंत्र्याला ७५ वर्षे व्हायला आली असतांना नागपूर शहरात एम्स आणण्यापासून तर आता कोरोनाबाधितांसाठी ६० पासून ते ५०० बेड्सची उपलब्धता असे विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गी लावले आहेत. विशेष म्हणजे ते अद्यापही नागपूर शहरात ठाण मांडून असून प्रत्येकाच्या सुविधेसाठी प्रयत्न करीत आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्रभर फिरून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भाचाही दौरा करून समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या पुढाकाराने नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूट मध्ये कोरोना बाधितांकरिता प्रथम चरणात १०० बेडची व्यवस्था झालेली आहे.

याउलट राज्य सरकार महाराष्ट्रात पूर्णत्वाने अपयशी ठरलेले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी वेळोवेळी राज्य सरकारला विविध मागण्या केल्या. मात्र राज्यातील सरकारने त्यांच्या मागण्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. असे असताना अतुल लोंढेंचे आरोप म्हणजे कोणाची सुपारी घेतली की स्वस्त प्रसिद्धीचा खटाटोप केलेला आहे याचा त्यांनी खुलासा करावा व त्यांचे ह्या कोरोना काळात काय योगदान आहे, ते देखील स्पष्ट करण्याचे आवाहन ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.