Published On : Thu, Jul 1st, 2021

डॉक्टरांचे कार्य ईश्वरासारखे : महापौर

कोव्हिडकाळात झटणाऱ्या डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’निमित्त मनपा तर्फे सत्कार

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयांसोबत खांद्याला खांदा लावून खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीही या शहरातील नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका वठविली. शहरातील सर्वच डॉक्टर देवदूत ठरले. या डॉक्टरांच्या भरवशावरच आता कितीही मोठी लाट आली तर त्याचा सामना करण्यासाठी नागपूरकर सज्ज आहेत, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोरोनाकाळात प्रिंट मीडियापासून सोशल मीडियावर डॉक्टरांवर ताशेरे ओढल्या गेले. मात्र, त्याची पर्वा न करता प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावले. नागपुरातील खासगी डॉक्टरांनी सुमारे २७ हजारांवर लोकांना बरे केले.

आयएमएसोबत मिळून नागपूर महानगरपालिकेने लोकसेवेचे अनेक उपक्रम राबविले. झोननिहाय रुग्णांचे समुपदेशन आयएमएच्या सुमारे १५२ डॉक्टरांनी केले तर ६७ डॉक्टरांनी मनपाच्या फेसबुक पेजवरून ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून जनजागृती केली. मनपाचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा ठरला. ७० लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला. अनेक नकारात्मक प्रतिक्रिया असतानाही या शहरातील डॉक्टर्स आणि कोरोना लढ्याशी जुळलेल्या प्रत्येकाचे कार्य प्रशंसनीय होते. मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे मनपाचे सफाई कर्मचारीच या काळात त्या व्यक्तीचा मुलगा, वडील बनले. या सर्व परिस्थितीशी सामना करीत ७९९९ रुग्ण असणाऱ्या नागपुरात आज कोरोना रुग्णसंख्येचा दररोजचा आकडा केवळ २५ च्या घरात आहे. हे एकत्रित लढ्याचे यश आहे. नागपुरातील वैद्यकीय सोयी-सुविधा वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा झाली असून लवकरच वैद्यकीय क्षेत्राच्या सोयीसंदर्भात नागपूकरांना मोठा बदल अनुभवायला मिळेल. आता कितीही मोठी लाट आली तरी नागपूरकर त्यासाठी तयार आहेत, असा विश्वास देत महापौरांनी ‘डॉक्टर्स डे’ च्या शुभेच्छा दिल्या.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी भावनिक मार्गदर्शन करीत वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स आणि कोव्हिडकाळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सेवा देणाऱ्या प्रत्येक योद्ध्याचे कौतुक करीत मनपा प्रशासनाच्या वतीने आभार मानले. या आव्हानात्मक परिस्थितीत प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य पार पडले. या काळात नागपूर शहराने केलेले कार्य हे देशातील कुठल्याही शहरापेक्षा उत्तम राहिले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. हे कार्य प्रसिद्धीसाठी कुणीही केले नाही. आम्ही १० चांगले काम केले आणि एखादी चूक झाली तर त्यावर टीका केली जाते. मात्र, आम्ही टीकेलाही तयार होतो. आम्ही जबाबदारीने आणि उत्तम कार्य करीत असल्याने टीकेला न घाबरता कर्तव्य बजावले. असे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठिशी आपण असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी झोनल आरोग्य अधिका-यांचे विशेष रुपाने अभिनंदन केले आणि त्यांच्या सदैव पाठीशी राहू, असा धीर ही दिला. टीमवर्क असल्यामुळे आपण या महामारीला नियंत्रण करु शकलो, असेही आयुक्त म्हणाले.

यावेळी डॉ. अजय केवलिया, डॉ. अशोक अरबट, डॉ. हरदास, डॉ. क्रिष्णा खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. खासगी डॉक्टरांनी कितीही त्रास दिला तरी मनपा प्रशासनाने तितकेच शांतपणे आमच्याशी जुळवून घेतले आणि आम्हाला प्रोत्साहन दिले, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व डॉक्टरांचा महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते मनपाचा दुपटटा, सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी केले. संचालन डॉ. टिकेश बिसेन यांनी केले.

सत्कारमूर्ती डॉक्टर्स
मेयोचे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, साथरोग नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. अशोक अरबट, डॉ. अनुप मरार, डॉ. रवींद्र खडसे, डॉ. स्वाती भिसे, निरीचे डॉ. क्रिष्णा खैरनार, डॉ. नंदकिशोर खराडे, डॉ. अजय हरदास, डॉ. अमोल दौंकलवार, डॉ. निर्भय कुमार, डॉ. मेघा जैतवार, डॉ. आतिक खान, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. साजिया, डॉ. टिकेश बिसेन, डॉ. ख्वाजा, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अश्विनी निकम, डॉ. रणवीर यादव, डॉ. मयूर, डॉ. वसुंधरा भोयर, संजय देवस्थळे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.