नागपूर: शहरातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण व्हावे यासाठी प्रचार, प्रसिद्धीसोबतच नियोजनही महत्त्वाचे आहे. यासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरणाचा दुसरा टप्पा ११ मार्चला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात ही मोहिम यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक गुरूवारी (ता.८) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, डॉ.सुनील धुरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आयुक्त अश्विन मुदगल यांनी आतापर्यंत झालेल्या पल्स पोलिओ अभियानाबाबतच्या माहितीचा आढावा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतला. पल्स पोलिओ अभियानाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. आतापर्यंत ज्या क्षेत्रात आपण पोहचू शकत नाही, त्याठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असे सूचित केले. पल्स पोलिओ हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याची उद्दीष्टपूर्ती झालीच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. एकही बालक यापासून वंचित राहता कामा नये, याची खबरदारी घ्या, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
बैठकीला मनपाच्या दहाही झोनचे झोनल अधिकारी, लसटोचक व अन्य संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.