Published On : Mon, Jun 24th, 2019

कृषीपंपाची थकबाकी 30 हजार कोटी एकाही शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित केला नाही : ऊर्जामंत्री

Advertisement

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची 30 हजार कोटींची थकबाकी असताना एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन बिल भरले नाही म्हणून खंडित करण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशनाचे पालन करीत हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केले.

विधान सभेत नियम 293 वरील दुष्काळाच्या चर्चेला उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह 48,540 कोटी रूपये एकूण वीज बिलाची थकबाकी आहे. यात 4 हजार कोटीपेक्षा अधिक पथदिव्यांची तर 8263 कोटी कायम वीजपूरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या थकबाकीचा समावेश आहे.

राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळात कोणत्याही शेतकऱ्याची वीज खंडित करून नये असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश होते. पैसे भरून प्रलंबित असलेली 5 लाख 27 हजार वीज कनेक्शन या शासनाने मार्च 18 पर्यंत दिले. 2 लाख 12 हजार कनेक्शन प्रलंबित असून त्या शेतकऱ्यांना मार्च 20 पर्यंत कनेक्शन देण्यात येतील.

एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर या उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यात येणार असल्याचे सांगून ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले शेतकऱ्यांना आता सौर ऊर्जा किंवा पारंपरिक ऊर्जा यापैकी कोणतेही कनेक्शन घेता येईल. दोन्ही पर्याय शेतकऱ्यांसाठी खुले आहेत.
वरील योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला कनेक्शन देण्यासाठी 2.5 लाख रूपये येतो. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी आपल्या उत्तरातून स्पष्ट केले.