नागपूर : शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागनदीला पूर आला आहे. या पुरामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर पाणी शिरल्याने अनेक वाहनांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असा सतर्कतेचा इशारा महापालिकेने दिला आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नागनदी इतर नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये.अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे कोणीही त्या दिशेकडे जाऊ नये.
नागपूर महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. नागरिकांना याची गरज पडल्यास ०७१२२५६७०२९ किंवा ०७१२२२५६७७७७७ या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना केले.