Published On : Wed, Jan 9th, 2019

सबलीकरणात तू अडकू नको, व्यवस्था चालविणारी बन!

Advertisement

उद्योजिका मेळाव्यात महिलांना मिळाला मंत्र

नागपूर : ‘सुपर मॉम’, ‘सुपर वुमन’ अशी लेबल लावत बाजाराने महिलांचे मार्केटिंग केले. मात्र प्रत्येक व्यक्तीला मर्यादा असतात. कुणीही ‘सुपर’ नसतो. स्त्रीचे सौंदर्य हे दिसण्यात नाही तर तिच्या कर्तृत्वात आहे. स्त्री ही पोषणकर्ती आहे. तिला कौतुकाची गरज नाही. तिच एक कौतुक आहे. त्यामुळे सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता व्यवस्था चालविणारी शासनकर्ती बन, असा मंत्र महिला उ‌द्योजिका मेळाव्यातील महिलांना मिळाला.

महानगरपालिका प्रशासनातील धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून दिलेला हा मंत्र उपस्थित महिलांना चेतविणारा ठरला. कवी अरुण काळे यांच्या कवितेचा संदर्भ देत महिलांना केलेले उद्बोधन अंगावर शहारे आणणारे ठरले.

नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने शहर समृध्दी उत्सवांतर्गत आयोजित ‘महिला उद्योजिका मेळाव्याच्या’ तिसऱ्या दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, लक्ष्मी नगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजु भिवगडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, अभियंता कल्पना मेश्राम, नगरसेविका मनिषा कोठे, जयश्री वाडीभस्मे उपस्थित होते.

पुढे बोलताना स्मिता काळे म्हणाल्या, गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही स्त्री ची समस्या कमी अधिक प्रमाणात सारखीच असते. ‘उद्योजिका’ हा दशकातला सर्वात महत्वाचा शब्द आहे. कारण या शब्दाचा अर्थच ‘आर्थिकदृष्ट्या सबल’ असा होतो. स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन त्यांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढू शकते. महिला उद्योजिका मेळाव्या सारख्या आयोजनातून हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

आज ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात वरिष्ठ पदावर महिला कार्यरत आहेत. इतिहासात, संत परंपरेतही महिलांचे कर्तृत्व झाकल्या गेले नाही. त्यामुळे स्त्री, तुला अवकाश मिळाले आहे, तू भरारी घे, कर्तृत्वाने मोठी हो, असा उपदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केला.

तत्पुर्वी महिला सशक्तीकरणाची मशाल पेटवून तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ‘स्वच्छ नागपूर’, ग्रीन नागपूर, सुंदर नागपूर’ असा संदेश असलेला ‘बलून’ मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आला.

दुपारी महिलांसाठी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत विजयी ठरलेल्या रुपमंत्रा संघाला पाहुण्यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन स्मिता खनगई यांनी केले. संपूर्ण मेळावा परिसरात मतदार नोंदणी जनजागृतीसाठी २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित लोकशाही पंधरवाडा संदर्भात फलकाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सत्कारमूर्ती

मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशीही पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या मृण्मयी अमर कुलकर्णी, दृष्टीबाधित असतानाही योग, नॅचरोपॅथी, संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिज्ञासा कुबडे, २२ वर्षांपासून निराधारांची सेवा करणाऱ्या, त्यांना आश्रय देणाऱ्या निशिगंधा रामटेके, परागकणांवर पीएच.डी. करणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मंगला गावंडे, संवेदना संस्थेच्या माध्यमातून स्वमग्न मुलांसाठी कार्यरत ज्योती फडके यांचा सत्कारमूर्तीत समावेश होता.

प्रिन्स डान्स ग्रुपचा धमाका

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ फेम ओरिसा येथील प्रिन्स डान्स ग्रुपने आपल्या विविध प्रकारातील नृत्याने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रारंभीच सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने प्रेक्षकांना देशभक्तीचे स्फुरण चढविले. त्यानंतर एकापेक्षा एक सादर केलेल्या सरस सादरीकरणाने रसिकांचे मनोरंजन केले. नृत्यादरम्यान मॅजिक शो, चित्रपट गीतेही सादर करण्यात आली. बुधवारी (ता. ९) दुपारी २ वाजता महिलांसाठी टॅलेंट हंट आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता इंटरनॅशनल अॅक्ट व दिव्यांग मुलांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे.