नाशिक – चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला संबोधीत करताना भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मोदी सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने मोदींनी दिली.मात्र गेल्या १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली,असा घणाघात पटोले यांनी केला.
काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मणिपूरपासून राहुल गांधी हे शेतकरी, तरुण, कामगार, महिला वर्गाला गॅरंटी देत आहेत. २००४ ते २०१४ या काळात युपीए सरकार जनतेचे, शेतकरी हिताचे निर्णय घेत होते परंतु मागील १० वर्षात केवळ मुठभर लोकांसाठी निर्णय घेतले जात आहेत. आज शेतकरी संकटात आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकारच जबाबदार असेही थोरात म्हणाले.